मुंबई : लोकसभा व विधानसभेच्या २०२४ मधील निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढविण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. प्रदेश पातळीवरील १२ प्रमुख नेते १५ ते ३० एप्रिल या कालावधीत राज्यभरात दौरे करणार असून लोकसभा व विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदारी प्रत्येक नेत्याकडे देण्यात आली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यानंतर होणाऱ्या लोकसभा-विधानसभा निवडणुका यांची तयारी भाजपने सुरू केली असून त्यादृष्टीने प्रदेशच्या विस्तारित सुकाणू समितीची बैठक बुधवारी प्रदेश कार्यालयात पार पडली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह प्रदेश पातळीवरील अन्य नेते बैठकीस उपस्थित होते.
बैठकीतील निर्णयांविषयी माहिती देताना आमदार अॅड.आशीष शेलार म्हणाले, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता कधी होतील, हे माहीत नाही. पण मुंबईसह सर्व महापालिका, जिल्हा परिषदा व अन्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे. प्रदेशच्या १२ नेत्यांचे दौरे होतील.
त्यांना लोकसभा-विधानसभा मतदारसंघनिहाय जबाबदाऱ्यांचे वाटप करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्ट कारभाराविरोधात प्रत्येक प्रभागात पोलखोल आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान, निधी आणि महामंडळांच्या वाटपावरून महाविकास आघाडीत धुसफुस सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या तुलनेत पुरेसा निधी मिळत नसल्याने शिवसेनेचे बहुतांश आमदार नाराज आहेत. त्यांच्या नाराजीचा कधीतरी स्फोट होईलच, असे दानवे आणि प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांना सांगितले.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/bsqZat2
via IFTTT