मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय (राणी बाग) येथे आज, रविवारी एकाच दिवशी तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी भेट दिली. या विक्रमी संख्येमुळे यापूर्वीचा २९ मे २०२२ रोजीचा विक्रम मागे टाकून नवा विक्रम नोंदवला.
दिवाळीच्या सलग सुट्टय़ांमुळे पर्यटकांची राणी बागेत गर्दी वाढत होती. तसेच, बहुसंख्य नोकरदार वर्गासाठी दिवाळीच्या सुट्टीचा आज (रविवार) अखेरचा दिवस होता. त्यामुळे, आबालवृद्धांसोबत बागेत विविध प्राणी, पक्षी पाहण्यासाठी गर्दी केली.
हेही वाचा >>> अडीच फूट उंची असणाऱ्या अझीमचं ठरलं लग्न! आता थेट पंतप्रधान आणि मुख्यमंत्रींनाच देणार लग्नाचं आमंत्रण
राणी बागेत विविध पक्षी, प्राणी आणण्यात आले आहेत. त्यासोबतच पेंग्विन हे मुख्य आकर्षण असल्याने फक्त राज्यासह देशभरातून पर्यटक राणी बागेत येतात. दोन वर्षांनंतर करोनाविषयक निर्बंध हटवण्यात आल्याने या बागेत आठवडय़ाच्या अखेरीस म्हणजे शनिवार-रविवारी आणि सार्वजनिक सुट्टय़ांच्या कालावधीत या उद्यान व प्राणिसंग्रहालयात येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत मोठी वाढ होते. उन्हाळय़ाच्या सुट्टीत २९ मे २०२२ रोजी या एकाच दिवशी ३० हजार ३७९ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिल्याने विक्रमाची नोंद झाली होती. त्या दिवशी सुमारे १० लाख ८४ हजार ७४५ रुपयांचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले होते. हा विक्रम रविवारी मोडला. या एकाच दिवसात तब्बल ३१ हजार २३२ पर्यटकांनी या प्राणिसंग्रहालयाला भेट दिली. त्यातून सुमारे ११ लाख ०५ हजार ९२५ रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. तर, शनिवारी २७ हजार ३९२ पर्यटकांनी भेट दिली होती. त्यातूनही ९ लाख ८८ हजार ०२५ रुपये उत्पन्नाची भर पडली. त्यामुळे या दोन दिवसांत ५८ हजार ६२४ पर्यटकांनी भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून एकूण २० लाख ९३ हजार ९५० रुपये इतके विक्रमी उत्पन्नदेखील प्राप्त झाले आहे.
महिन्यात एक कोटीचे उत्पन्न..
राणी बागेत येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढल्याने गैरसोय होऊ नये, म्हणून महिलांसाठी स्वतंत्र तिकीट खिडकी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच अतिरिक्त पंधरा सुरक्षारक्षक नेमून गर्दीचे योग्य रीतीने नियंत्रण करण्यात आले. ऑक्टोबर महिन्यात सुमारे अडीच लाख पर्यटकांनी उद्यानाला भेट दिल्याची नोंद झाली असून त्यातून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा अधिकचे उत्पन्न महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे, अशी माहिती वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली आहे.
from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/qFnXZhG
via IFTTT