Type Here to Get Search Results !

खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार?; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण; उच्च न्यायालयाची विचारणा

मुंबई : मालेगाव येथे २००८ साली झालेल्या बॉम्बस्फोटांशी संबंधित खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती काळ लागेल, अशी विचारणा उच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) केली. खटल्याचे कामकाज जलदगतीने करण्याचे आदेश सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने वारंवार दिले आहेत. मात्र हे कामकाज संथगतीने सुरू असल्याने आरोपी समीर कुलकर्णी याने याचिका दाखल केली आहे.

न्यायमूर्ती अजय गडकरी आणि मिलिंद जाधव यांच्या खंडपीठासमोर कुलकर्णी याच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळी या गतीने खटला पूर्ण करण्यासाठी आणखी किती वर्षे लागतील, असा प्रश्न न्यायालयाने एनआयएला विचारला. त्या वेळी खटला जलदगतीने चालवण्याच्या न्यायालयाच्या मागील आदेशांचे पालन करण्यासाठी प्रत्येक सुनावणीच्या वेळी किमान दोन साक्षीदारांना हजर करण्यात येत असल्याचे एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी न्यायालयाला सांगितले. परंतु अनेक वेळा एकाच साक्षीदाराची साक्ष अनेक दिवस नोंदवण्याचे काम सुरू असते. खटल्यातील एका साक्षीदाराची सलग नऊ दिवस तपासणी केली गेली. अनेक दिवस सुरू असलेली उलटतपासणी न्यायालय किंवा आम्ही थांबवू शकत नाही, असेही पाटील यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला.

युक्तिवाद करताना नियमांचे पालन करण्याची सूचना

मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याशी संबंधित खटला, समझौता बॉम्बस्फोट खटला, अजमेर बॉम्बस्फोट खटला कधीच निकाली निघाले. परंतु हा खटला अद्यापही निकाली निघालेला नसल्याचे आरोपी समीर कुलकर्णीच्या वतीने न्यायालयाला सांगितले. कुलकर्णी याच्या आरोपांना एनआयएचे वकील संदेश पाटील यांनी आक्षेप घेतला. न्यायालयानेही कुलकर्णी याला युक्तिवाद करताना नियमांचे पालन करण्यास सांगितले. आरोपी अर्ज दाखल करत राहतात आणि खटल्याच्या सुनावणीला विलंब करतात, असेही न्यायालयाने सुनावले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/BoMYrak
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.