भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलंय. या पार्श्वभूमीवर असं काय आहे की, भाजपाचे नेते वारंवार राज ठाकरेंच्या भेटीला जात आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी चंद्रशेखर बावनकुळेंना विचारला. यावर बावनकुळेंनी ही भेट अगदीच कौटुंबिक असल्याचं आणि केवळ गप्पा झाल्याचं म्हटलं. तसेच या भेटीत मी, राज ठाकरे आणि परमेश्वर असे केवळ तिघेच होतो, असंही नमूद केलं.
मनसे आणि भाजपा या दोन पक्षांमध्ये नेमके काय सुरू आहे, पालिका निवडणुकांमध्ये युती होणार का? असे प्रश्न पत्रकारांनी वारंवार विचारले. त्यानंतर गप्पांमध्ये काय झाले ते तिघांनाच माहीत, असे सांगत बावनकुळे यांनी चक्क परमेश्वरालाच मध्ये आणले.
“राज ठाकरे हे हिंदुत्वाचे रक्षक आहेत”
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “राज ठाकरे हे हिंदुत्वाचे रक्षक आहेत. एका मोठ्या पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची भेट घेणे साहजिकच होते. प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर मी विविध पक्षांच्या अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या. त्यात आज राज ठाकरे यांचीही भेट घेतली. त्यात वेगळे काहीच नाही. पक्षाच्या संदर्भातील राजकीय निर्णय घेण्यासाठी केंद्रात पक्षाध्यक्ष नड्डाजी आहेत. महाराष्ट्रात देवेंद्रजी आहेत. संबंधित राजकीय नेतृत्व त्याचा निर्णय वेळ आल्यावर घेईल.”
“महागाईला आंतरराष्ट्रीय कारणेच अधिक आहेत”
सध्या सामान्य माणसाला महागाईने पछाडले आहे, याचा परिणाम निवडणुकांवर होईल का? असे विचारल्यानंतर बावनकुळे म्हणाले की, महागाईला आंतरराष्ट्रीय कारणेच अधिक आहेत. बाकी महागाई अजिबात नाही आणि त्यामुळे तिचा काही परिणाम होण्याची शक्यताही नाही.
हेही वाचा : “राज ठाकरे हाजीर हो”, औरंगाबाद पोलिसांची नोटीस
अमरावती लोकसभा आणि बडनेरा विधानसभेत कमळ फुलणार अशी घोषणा केली आहे, मग राणा दाम्पत्य भाजपात येणार की, त्यांच्याशी युती करणार? या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले की, कमळ फुलणार हे नक्की. तशी घोषणाच मी दहिहंडी कार्यक्रमात तिथे केली. आता युती की ते भाजपात याचा निर्णय २०२४ च्या निवडणुकांच्या वेळेस सर्वांसमोर येईलच.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/Hs2C4Xt
via IFTTT