Type Here to Get Search Results !

भुयारी मेट्रोची चाचणी यशस्वी

मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मुंबईतील पहिल्यावहिल्या भुयारी मेट्रो प्रकल्पांतर्गत मंगळवारी प्रथमच भुयारी मार्गावर मेट्रोची चाचणी पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या मेट्रो गाडीला हिरवा झेंडा दाखविला आणि सारीपूत ते मरोळ अशी तीन किमीचा पल्ला या मेट्रो गाडीने गाठला. मेट्रो ३ प्रकल्पातील पहिल्या मेट्रो गाडीची, भुयारी मार्गिकेची चाचणी यशस्वी झाली आणि मुंबईकर या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. आता मुंबईकरांना मेट्रोच्या भुयारी मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी डिसेंबर २०२३ पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) माध्यमातून ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो मार्गिकेचे काम २०१६ पासून हाती घेण्यात आले आहे. ही मार्गिका २०२१ मध्ये वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र तांत्रिक अडचणी, आव्हानात्मक कामे आणि कारशेडचा वाद आदी कारणांमुळे प्रकल्प पूर्णत्वास जाण्यास विलंब झाला. पण आता मात्र एमएमआरसीने या मार्गिकेतील आरे कारशेड ते बीकेसी असा पहिला टप्पा डिसेंबर २०२३ मध्ये सुरू करण्याचा निर्धार केला. दुसरीकडे आरे कारशेडच्या कामालाही सुरुवात करण्यात आली असून कारशेडचे काम जून २०२३ मध्ये पूर्ण करण्याचे नियोजन आहे. एकूणच डिसेंबर २०२३ मध्ये पहिला टप्पा सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने एमएमआरसीने मंगळवारी मेट्रो ३ ची चाचणी करून एक महत्त्वाचे पाऊल पुढे टाकले. कोणताही मेट्रो प्रकल्प सेवेत दाखल करण्यासाठी चाचणी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतरच मेट्रो मार्गिकेला आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून सुरक्षा प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यामुळे मंगळवारीची यशस्वी चाचणी मेट्रो ३ चा पहिला टप्पा दृष्टिक्षेपात आणण्याच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल आहे.

पर्यावरणप्रेमींचे आंदोलन

‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३’ प्रकल्पातील पहिल्या भुयारी मेट्रोची चाचणी सारीपूत नगरमध्ये पार पडली. मात्र, मेट्रो-३ ची चाचणी सुरू असतानाच आरे वसाहतीमधील कारशेडच्या मुद्दय़ावरून पर्यावरणप्रेमींनी सारीपूत नगर येथे आंदोलन सुरू केले. यावेळी पर्यावरणप्रेमींनी कारशेड विरोधात घोषणाबाजी केली. दरम्यान, पोलिसांनी दोन तरुणींसह एकूण सहा पर्यावरणप्रेमींना ताब्यात घेतले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/9G4pItN
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.