Type Here to Get Search Results !

जम्बो रुग्णालये बंद ; केवळ सेव्हन हिल्स, सोमय्या जम्बो रुग्णालये सुरू राहणार

मुंबई : करोना साथीचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे आता मुंबईतील सर्व जम्बो करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे. केवळ मरोळ येथील सेव्हन हिल्स आणि चुनाभट्टीजवळील के. जे. सोमय्या जम्बो रुग्णालय सुरू राहणार आहेत.

मुंबईत करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वेगाने होणारी रुग्णवाढ लक्षात घेता महानगरपालिकेने सर्वप्रथम बीकेसी येथे पहिले जम्बो करोना रुग्णालय सुरू केले. त्यानंतर हळूहळू मुंबईत दहा जम्बो रुग्णालये सुरू करण्यात आली. करोनाची तिसरी लाट ओसरल्यानंतर मुंबई महानगरपालिकेने मोजकीच जम्बो रुग्णालये शहरात सुरू ठेवली होती, अन्य रुग्णालये बंद केली होती. यातील काही रुग्णालये बंद करण्यात आली होती. मात्र आवश्यकता भासल्यास ती पुन्हा सुरू करता यावी यादृष्टीने तेथे यंत्रणा ‘जैसे थे’ ठेवण्यात आली होती. चौथी लाट सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर जम्बो रुग्णालये बंद करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला होता.

करोनाच्या चौथ्या लाटेमध्ये रुग्णसंख्या वाढली तरी रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या तुलनेने फार कमी होती. सध्या रुग्णालयात १९२ रुग्ण दाखल आहेत. दैनंदिन सुमारे अडीचशे रुग्ण नव्याने आढळत असले तरी रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्या २० पेक्षाही कमी आहे. करोनाचा प्रादुर्भावही आता कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेले गोरेगावचे नेस्को, बीकेसी, मुलुंड, भायखळा येथील रिचर्डसन अण्ड क्रुडास, वरळीचे एनएससीआय, कांजुरमार्ग, दहिसर आणि मालाड ही जम्बो रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला आहे.

जम्बो रुग्णालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच ही रुग्णालये पूर्णपणे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. या रुग्णालयांतील वैद्यकीय उपकरणांसह सर्व साहित्य मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांना आवश्यकतेनुसार देण्यात येईल, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

पालिकेचे सेव्हन हिल्स आणि सोमय्या येथील जम्बो करोना रुग्णालये सध्या सुरू राहतील. सोमय्याचे रुग्णालय रुग्णांना दाखल करण्याकरिता सुरू झाले नव्हते. आता हे रुग्णालय पूर्णपणे तयार झाले असून येथे लसीकरण सुरू आहे. या रुग्णालयात १२०० खाटा उपलब्ध असून यातील २०० अतिदक्षता खाटा आहेत. याव्यतिरिक्त मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ११ हजार खाटा उपलब्ध आहेत. त्यामुळे आवश्यकता भासल्यास या खाटा करोनाच्या रुग्णांसाठी सुरू केल्या जातील. त्यामुळे रुग्ण काही प्रमाणात पुन्हा वाढले तरी खाटांची कमतरता भासणार नाही. जम्बो रुग्णालयांचा व्यवस्थापन खर्च मोठा आहे. सध्या या रुग्णालयांची तितकी आवश्यकता नसल्यामुळे ती बंद करण्यात येत आहेत, असे मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त संजय कुऱ्हाडे यांनी सांगितले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/pluUPL2
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.