Type Here to Get Search Results !

ठाण्यात प्रकल्पांचे ठाण ; ‘मेट्रो’च्या विविध कामांना ‘एमएमआरडीए’ची मंजुरी

मुंबई : ठाण्याचे रहिवासी असलेले एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून त्यांनी तेथील अनेक विकास प्रकल्पांचे आराखडे सादर करण्याचा, तर काही प्रकल्पांना मंजुरी देण्याचा धडाका लावला असून सबंधित सर्व सरकारी संस्था आणि प्राधिकरणांनीही ठाणे परिसरावर लक्ष केंद्रित केल्याचे निदर्शनास येत आहे. ‘एमएमआरडीए’च्या कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीच्या केंद्रस्थानीही ‘ठाणे’च होते.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) कार्यकारी समितीच्या शुक्रवारी झालेल्या २७१ व्या बैठकीत ठाण्यातील अनेक प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.

ठाणे आणि मिरा रोडला जोडणारी ‘मेट्रो १० गायमुख ते शिवाजी चौक’ (मिरारोड) तसेच ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारी ‘मेट्रो १२ कल्याण ते तळोजा मेट्रो’ मार्गिकेचा प्रकल्प आराखडा तयार आहे.आता शक्य तितक्या लवकर दोन्ही मार्गिकांच्या कामाला सुरुवात करण्याचा निर्णय ‘एमएमआरडीए’ने घेतला आहे. त्यामुळेच आता बांधकाम निविदा प्रक्रिया राबविण्यासाठीची निविदा अंतिम करण्यात आली आहे. त्यासाठी सायस्त्रा कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी दिली. येत्या सहा महिन्यांत बांधकामासाठी निविदा काढण्यात येईल आणि २०२३ मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कार्यकारी समितीच्या बैठकीत मेट्रो मार्ग ५ (ठाणे – भिवंडी – कल्याण) मेट्रो मार्गिकेतील ठाणे – भिवंडी – वडपा (वि.रा.म.- ८४) रस्त्यावरील कशेळी पथकर नाका ते अंजुरफाटय़ादरम्यान रस्त्याची पायाभूत सुधारणा, पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे, रोड फर्निचर आणि इतर संबंधित कामासाठी मागविण्यात आलेल्या ई – निविदेसाठी मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता लवकरच या कामालाही सुरुवात होणार आहे. त्याच वेळी ठाण्यातील घोडबंदर मार्गावरील प्रस्तावित कासार वडवली आणि भाईंदरपाडा या दोन उड्डाणपुलांचे बांधकाम, मेट्रो मार्ग-अ मधील सीए ५४ चे बांधकाम करणाऱ्या कंत्राटदारामार्फत करण्यात येणार आहे. या कंत्राटदारास मुंबई महानगरपालिकेच्या २०१८च्या दरसूचीतील दरानुसार बांधकाम करण्यास मान्यता देण्यात आली.

मेट्रो १० : गायमुख ते शिवाजी चौक (मिरारोड)

– ९.२ कि.मी.ची मार्गिका

– ४ मेट्रो स्थानके : गायमुख रेती बंदर, वर्सोवा चार फाटा, काशिमिरा आणि शिवाजी चौक.

– एकूण अपेक्षित खर्च ३६०० कोटी रुपये

– ठाणे आणि मिरारोडला थेट जोडणी

मेट्रो १२ : कल्याण ते तळोजा २०.७५ कि.मी.ची मार्गिका

– १८ मेट्रो स्थानके : कल्याण एपीएमसी, गणेश नगर (कल्याण), पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एमआयडीसी, सागाव, सोनारपाडा, मानपाडा (डोंबिवली पूर्व), हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाळे, वाकळण, तुर्भे, पिसार्वे आगार, पिसार्वे आणि तळोजा.

ठाणेनवी मुंबई जोडमार्गिका

– अपेक्षित खर्च ४१३२ कोटी रुपये.

– मेट्रो मार्ग – ४ आणि ४ अ च्या साधारण सल्लागारास २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत मुदतवाढीच्या प्रस्तावास, तसेच अधिदानासही मान्यता.

– मेट्रो मार्ग ७ आणि मेट्रो मार्ग २ब प्रकल्पाच्या सल्लागाराच्या कार्यकालावधीत मेट्रो मार्ग ७ करीता ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत, तसेच मेट्रो मार्ग २ ब करिता ३० जून २०२४ पर्यंत मुदतवाढीस, कंत्राटाच्या रकमेतील वाढीचा प्रस्ताव स्वीकारण्यास आणि अधिदान करण्यास मान्यता.

– तळोजा एमआयडीसी रोड ते एनएच ४ (जुना) दरम्यानच्या विकास आराखडय़ातील प्रस्तावित रस्त्याच्या कामासाठीची निविदा मंजूर. प्रत्यक्ष कामानुसार संभाव्य भाववाढीस आणि त्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या करारनाम्यातील अटीप्रमाणे अधिदानास मान्यता.

नागरिकांची मौज..

दोन आठवडय़ांपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाणेकरांना अतिरिक्त पाण्याची भेट दिली. भातसा आणि बारवी धरणातून अतिरिक्त १२० दशलक्ष लिटर्स पाणी ठाणेकरांना मंजूर करण्यात आले. ठाण्यातील कोंडीवर उतारा म्हणून सर्व संबंधित यंत्रणांना आदेश देऊन चोवीस तास खड्डे बुजवण्यासाठी स्वतंत्र योजना आखण्याचे निर्देश दिले. याशिवाय नुकतीच कळव्यात भव्य बस पोर्ट आणि अनेक शासकीय कार्यालयांच्या पुनर्विकासाची घोषणा केली.

होणार काय?

ठाणे आणि मिरा रोडला जोडणारी ‘मेट्रो १० गायमुख ते शिवाजी चौक’ (मिरा रोड) तसेच ठाणे आणि नवी मुंबईला जोडणारी ‘मेट्रो १२ कल्याण ते तळोजा मेट्रो’ आता लवकरच मार्गी लागणार आहे. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून २०२३ मध्ये दोन्ही मार्गिकांच्या कामासाठी निविदा काढण्याचे ‘एमएमआरडीए’चे नियोजन आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/I1TFyu8
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.