Type Here to Get Search Results !

अनिल देशमुख भ्रष्टाचारप्रकरणी सचिन वाझे माफीचा साक्षीदार

मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे हे माफीचा साक्षीदार होणार आहेत. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी मंजुरी दिली आहे. वाझे यांना माफीचा साक्षीदार होण्यासाठी आता आवश्यक असलेल्या कायदेशीर प्रक्रिया आणि अटींची पूर्तता करावी लागणार आहे, असेही सीबीआयतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

वाझे यांनी न्यायालय आणि सीबीआयला पत्र लिहून याप्रकरणी माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी दर्शवली होती. माफीचा साक्षीदार बनल्यावर संबंधित आरोपीला प्रकरणातील अन्य आरोपींविरोधात तपास यंत्रणेचा साक्षीदार म्हणून साक्ष नोंदवावी लागते. माफीच्या साक्षीदाराने दिलेली साक्ष ही प्रकरणातील अन्य आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यासाठी वापरली जाते. माफीचा साक्षीदार झाल्यानंतर आरोपीला माफी मिळते.

वाझे यांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ३०६ अन्वये माफीचा साक्षीदार होण्यासाठी न्यायालयासमोर अर्ज दाखल केला होता. त्यांनी तपास यंत्रणेला तपासात पूर्ण सहकार्य केल्याचे आणि सीबीआयने फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १६४ अंतर्गत त्यांचा दंडाधिकाऱ्यांसमोर जबाबही नोंदवल्याचे अर्जात नमूद केले आहे. देशमुख हे गृहमंत्रीपदी असताना त्यांच्या सांगण्यावरून मुंबईतील मद्यालये आणि रेस्टॉरंटमधून पैसे गोळा केल्याचा आणि ती रक्कम देशमुख यांच्या सहकाऱ्यांना दिल्याचा दावा वाझे यांनी केला आहे.

ईडीलाही पत्र

वाझे यांनी देशमुखांविरोधातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातही माफीचा साक्षीदार होण्याची तयारी दर्शवणारे पत्र अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) लिहिले आहे. मात्र त्या प्रकरणात अद्याप काहीही निर्णय घेण्यात आलेला नाही. याउलट आर्थिक गैरव्यवहारात वाझे यांचा सक्रिय सहभाग असल्याचे दिसून येत असल्याचे सकृद्दर्शनी निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाने वाझे यांचा जामीन अर्ज नुकताच फेटाळला होता.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/yTWLCaJ
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.