Type Here to Get Search Results !

“पत्र व्यवस्थित वाचा”, शिवाजी महाराजांच्या समाधीबाबत ब्रिटिश अधिकाऱ्याचं पत्र पोस्ट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले…

राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत केलेल्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि बांधकाम याबाबत सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून टिळकांनी पैसे जमा केले, पण जीर्णोद्धार केला नाही, असा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. त्यांनी याबाबत ट्वीट करताना सोबत ब्रिटिश अधिकाऱ्यांचा पत्रव्यवहार देखील जोडला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध आणि त्याचे पूर्ण बांधकाम याबाबतचे सगळे ऐतिहासिक कागदपत्र उपलब्ध आहेत. त्यावरून हे सिद्ध होते की लोकमान्य टिळकांनी समाधी बांधण्यासाठी समिती स्थापन केली होती, पैसेही जमा केले होते पण त्यांनी जीर्णोद्धार केला नाही.”

“शिवाजी महाराजांची समाधी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली”

“छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा जीर्णोद्धार १९२६ मध्ये ब्रिटिशांनी आणि शिवाजी स्मारक जीर्णोद्धार समिती या दोघांनी मिळून केला. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ही खरी संभाजी महाराज यांनी बांधून ठेवली होती, पण ती नंतर दुर्लक्षित करण्यात आली. पत्र व्यवस्थित वाचा.

“चुकीचा इतिहास तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न आम्ही घडू देणार नाही”

“राजकीय पुढाऱ्यांनी समाजातील महागाई, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांबद्दल बोलले पाहिजे. पण काही नेते हे विषय सोडून विनाकारण चुकीचा इतिहास सांगून तरुणांच्या माथी मारून महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. हा प्रयत्न आम्ही कधी यशस्वी होऊ देणार नाही,” असा स्पष्ट इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला. ते आज (२ मे) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधत होते.

“भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका”

औरंगाबादमधील सभेत राज ठाकरे यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाला जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले आणि संदर्भ देऊन प्रतिवाद केला. तुम्हाला भोंग्यावर बोलायचं असेल तर बोला, पण इतिहासाला हात घालू नका, असे थेट आव्हानही जितेंद्र आव्हाड यांनी दिले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीवरुन राज ठाकरे यांनी वाद सुरू केला यावर जितेंद्र आव्हाड यांनी ऐतिहासिक दाखले देऊन महाराजांची समाधी ही छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली असल्याचे सांगितले.

“फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली”

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “१८६९ साली महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर जाऊन समाधीस्थळी स्वच्छता केली. त्याची बातमी नारायण मेघजी लोखंडे यांनी दीनबंधू वर्तमानपत्रात छापून आणली होती. फुलेंचा पत्रव्यवहार, शाहू महाराजांचा पत्रव्यवहार आजही आर्काईजमध्ये उपलब्ध आहे. फुलेंनी समाधीच्या जीर्णोद्धारासाठी पहिली सभा घेतली होती, त्या सभेला करवीर संस्थानचे प्रमुख आबासाहेब घाटगे उपस्थित होते. आबासाहेबांनी त्यांचे अभियंते रायगडावर पाठवले देखील होते. मात्र सहा महिन्यातच त्यांचे निधन झाले.”

“लोकमान्य टिळक फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले”

“कालांतराने महात्मा फुलेंचेही निधन झाल्यामुळे ही मोहीम थांबली. त्यानंतर १८९५ साली टिळकांनी हे काम हाती घेतले. त्यावेळचे सर्व संस्थानिकांना त्यांनी सोबत घेतले. लोकमान्य टिळक हे फक्त दोन वेळा रायगड किल्ल्यावर गेले होते, असे इतिहासात नमूद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे छायाचित्र नसल्यामुळे त्यांनी नाना फडणवीसांचे छायाचित्र सिंहासनावर ठेवल्याचा ऐतिहासिक संदर्भ आहे. १९२० साली टिळकांचे निधन झाले, तोपर्यंत समाधीसाठी काहीही काम झाले नव्हते. त्यांनी समाधी जीर्णोद्धार समिती स्थापन केली होती, त्यासाठी निधी गोळा केला होता. मात्र तो निधी ज्या बँकेत ठेवला होता, ती बँक बुडाल्याचे सांगितले गेले,” असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

“चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले”

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, “समाधी जीर्णोद्धार समिती काम करत नसल्यामुळे १९२६ साली ब्रिटिशांनी समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम स्वतःकडे घेतले. या इतिहासावर मी कुणाशीही चर्चा करण्यासाठी तयार आहे. वर्तमान इतिहासकारांनाही हे संदर्भ माहीत आहेत. इतिहास असा कुणाच्याही नावावर खपवता येत नाही. चुकीचा इतिहास सांगूनच आमचे वाटोळे केले.”

“पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली”

“भारतात ज्यांनी खरोखर इतिहास लिहिला त्यांची खूप मोठी परंपरा आहे. अनेक ब्राह्मण लेखकांनी इतिहास लिहिला आहे, त्यावर आमचा आक्षेप नाही, पण पुरंदरेंनी इतिहास नाही, तर कांदबरी लिहिली आहे. कांदबरी इतिहास नसते. इतिहास हा जातीचा, धर्माचा नसतो,” असे आव्हाड म्हणाले.

“…मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का?”

पुरंदरे यांच्या जातीवरुन राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला उत्तर देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, “शरद पवार यांनी कधीही जातीभेद केला नाही. कुसुमाग्रज यांच्या नावावरुन दिला जाणारा पुरस्कार सुरू करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला होता. विरोधी पक्षात असतानाही शरद पवारांना अनेक साहित्य संमेलनाचे उद्घाटक म्हणून साहित्यिकांनी बोलावले होते. मग हे सर्व साहित्यिक विकले गेले होते का?”

“अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध, पण…”

“एस. एम. जोशीपासून अनेक ब्राह्मण नेत्यांसोबत शरद पवारांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. पण मुद्दामहून अपप्रचार करुन महाराष्ट्र पेटवण्याचे कारस्थान काही लोक करत आहेत,” अशी टीकाही जितेंद्र आव्हाड यांनी केली. पुरंदरेंच्या साहित्याला ज्ञानपीठ का नाही मिळाला? किंवा ऐतिहासिक लिखाणाबद्दल त्यांना एकाही विद्यापीठाने डॉक्टरेट का नाही दिली? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केले.

“आजवर राज ठाकरे चैत्यभूमीवर का नाही गेले?”

“तरुणांमध्ये चुकीचा इतिहास जात आहे. राज ठाकरे शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले नाही, असा आरोप करतात, पण चैत्यभूमीपासून अगदीजवळ राहत असूनही आजवर राज ठाकरे चैत्यभूमीवर का नाही गेले? शाहू-फुले-आंबेडकरांचे नाव का घेत नाहीत? असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी विचारला.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/HcSs6hn
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.