मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण रद्द केल्यामुळे शासकीय सेवेतील निवडप्रक्रियेतून बाद झालेल्या मराठा समाजातील उमेदवारांसाठी अधिसंख्यपदे निर्माण करण्यास विधिज्ञांनी प्रतिकूल अभिप्राय दिला आहे. त्यामुळे अधिसंख्यपदासंबंधीचा विषय वगळून मराठा समाजाच्या इतर मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना राज्य शासनाने संबंधित विभागांना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी २४ व २८ फेब्रुवारी अशा दोन बैठका झाल्या होत्या. सामान्य प्रशासन विभागाने त्याचे इतिवृत्त प्रसिद्ध केले आहे. त्यात अधिसंख्यपदे निर्माण करण्याच्या मागणीबाबत राज्य शासनाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ मे २०२१ च्या निर्णयान्वये एसईबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे एसईबीसी संवर्गातील जे उमेदवार निवडप्रक्रियेतून बाद झाले आहेत, त्यांना शासकीय सेवेत नियुक्त्या देण्याकरिता अधिसंख्यपदे निर्माण करता येणार नाहीत, त्यामुळे शासनाने हे प्रकरण बंद करावे, असा कायदेशीर अभिप्राय ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. परमजितसिंग पटवालिया यांनी दिल्याचे महाधिवक्त्यांनी सांगितले. त्यामुळे अधिसंख्यपदे निर्माण करण्याचा विषय शासनस्तरावर निकाली काढण्यात यावा, असे संबंधित विभागांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मराठा समाजाच्या इतर मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्यास संबंधित विभागाना सांगितले आहे. मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाचा अभ्यास करण्यासाठी स्वंतत्र व समर्पित आयोग स्थापन करण्याची कार्यवाही इतर मागासवर्ग बहुजन कल्याण विभागाला करण्यास सांगण्यात आले आहे. सध्याचा न्या. निरगुडे आयोग फक्त ओबीसींशी संबंधित प्रकरणे हातळतील अशी सुधारणा करण्याचे ठरले आहे.
सूचना काय? :
- मराठा आंदोलत्र्यांवरील न्यायालयातील ११४ प्रलंबित खटले निकाली काढण्यासाठी तत्काळ कार्यवाही करण्यात यावी
- परदेशी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कर्जावरील व्याज परताव्याबाबत धोरण तयार करणे
- राज्यातील विनावापर बांधून तयार असलेल्या शासकीय इमारतींचा मराठा विद्यार्थ्यांच्या वसतिगृहांसाठी प्राधान्याने वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासंदर्भात तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाला देण्यात आल्याची माहिती या इतिवृत्तात देण्यात आली आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/h0mdfzQ
via IFTTT