Type Here to Get Search Results !

“नवाब मलिकांविरोधात ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे दिल्ली न्यायालयाचे आदेश”, भाजपा नेत्याचा दावा

दिल्लीच्या न्यायालयाने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात पुढील ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याचा दावा भाजपा नेते मोहित कंबोज यांनी केलाय. तसेच आता मुंबई पोलीस नवाब मलिकांना कधी अटक करते याची सर्व देश वाट पाहत असल्याचं मोहित कंबोज यांनी म्हटलंय. त्यांनी ट्वीट करत हा दावा केला आहे.

मोहित कंबोज म्हणाले, “समीर वानखेडे यांनी महाराष्ट्रातील मंत्री असलेल्या बिघडलेल्या नवाबांविरोधात केंद्रीय अनुसुचित जाती आयोगाकडे अॅट्रोसिटी कायद्यानुसार तक्रार केली होती. आज दिल्लीच्या न्यायालयाने मुंबई पोलिसांना पुढील ७ दिवसात मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिलेत. त्यांनी मागील ४ महिन्यात वानखेडे कुटुंबाविरोधात अनेक आरोप केले.”

“जातीच्या आधारावर भारताच्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप”

“एका मंत्र्याने आपल्या पदाचा गैरवापर करत जातीच्या आधारावर भारताच्या प्रामाणिक अधिकाऱ्यावर आरोप केले. त्याची दखल घेऊन न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आम्ही या आदेशाचं स्वागत करतो. आता मुंबई पोलीस नवाब मलिकांविरोधात कधी गुन्हा दाखल करते हे पाहणार आहोत,” असं मोहित कंबोज यांनी म्हटलं.

हेही वाचा : “किरीट सोमय्या भाजपाच्या आयटम गर्ल”; नवाब मलिकांचे वादग्रस्त वक्तव्य

“नवाब मलिकांना कधी अटक होते यांची सर्व देश वाट पाहात आहे”

“हा अजामीनपात्र गुन्हा आहे. आता त्यांना कधी अटक होते यांची सर्व देश वाट पाहात आहे. जोपर्यंत देशात न्यायालयीन व्यवस्था आहे तोपर्यंत देशातील दीडशे कोटी जनतेचा भारतीय संविधानावर आणि भारतावर विश्वास कायम राहील,” असंही कंबोज यांनी नमूद केलं.

The post “नवाब मलिकांविरोधात ७ दिवसात गुन्हा दाखल करण्याचे दिल्ली न्यायालयाचे आदेश”, भाजपा नेत्याचा दावा appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/i5qdHGgDy
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.