Type Here to Get Search Results !

शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा पेंग्विनवरून वाद

महापौरांकडून अहमदाबादमधील पेंग्विन कक्षाशी तुलना

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विनवरून शिवसेना आणि भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या वाक्युद्धाचा आता आणखी भडका उडाला आहे. अहमदाबादच्या सायन्स सिटी सेंटरमधील पेंग्विन कक्षाची पाहणी करून आलेल्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपवर टीकास्र सोडले आहे. सायन्स सिटी आणि राणीच्या बागेतील पेंग्विन प्रकल्पासाठी झालेला खर्च, पर्यटकांकडून वसूल करण्यात येणारे शुल्क, अन्य सोयी-सुविधांची तुलना करीत महापौरांनी भाजपवर शरसंधान केले.

राणीच्या बागेतील पेंग्विन कक्षावर केलेल्या खर्चावरून भाजपने सत्ताधारी शिवसेनेवर वारंवार टीका केली आहे. पेंग्विनच्या देखभालीसाठी आलेल्या प्रस्तावावरूनही भाजपने शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता. पेंग्विन हा या दोन राजकीय पक्षांतील वादाचा मुद्दा बनला होता. त्यातच आता भाजपची सत्ता असलेल्या गुजरातमध्येही पेंग्विनचे आगमन झाले आहे. हा कक्ष स्थापन करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासनाची मदतही घेण्यात आली होती. त्यामुळे महापौर किशोरी पेडणेकर व उपमहापौर सुहास वाडकर यांनी नुकतीच अहमदाबादमधील पेंग्विन प्रकल्पाला भेट  दिली व त्याच्या ध्वनीचित्रफिती समाजमाध्यमांवर प्रसारित केली. त्यावरून भाजपनेही त्यांच्यावर टीका सुरू केली होती. या पार्श्वभूमीवर महापौरांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन अहमदाबादमधील पेंग्विनवर झालेला खर्च, त्या प्रकल्पाचा खर्च, पेंग्विनची नावे यांची माहिती दिली. अहमदाबाद येथे सायन्स सेंटरमधील पेंग्विन प्रकल्पासाठी २५७ कोटी रुपये खर्च झाला आहे.  गुजरातमध्ये पेंग्विन पाहण्यासाठी ३०० रुपये शुल्क मोजावे लागते. प्रत्येक प्राणी पहण्यासाठी वेगवेगळे शुल्क आकारले जाते. प्रत्येक कक्षासाठी वेगळा आकार आहे. गुजरातमधील सायन्स सिटीत प्रत्येक ठिकाणी पैसे घेतले जातात. गुजरातमध्ये मुंबईप्रमाणे कुठलीच सुविधा विनाशुल्क नाही. गुजरातमध्ये तज्ञ डॉक्टरांचे पथक नाही. गुजरातमधील पेंग्विन कक्षातील डॉक्टर मुंबईतूनच अनुभव घेऊन तिकडे गेले आहेत. गुजरातमधील पेंग्विन कक्ष उभारण्यासाठी मुंबईचीच मदत घेण्यात आली आहे, असेही महापौरांनी सांगितले.

शेलार, भातखळकरांना ‘गुजरातचे पेंग्विन’ म्हणायचे का?

आम्ही गुजरातमध्ये स्वखर्चाने गेलो. मला मुक्या प्राण्यावर बोलायचे नव्हते, पण राजकारण केले जात असल्याने बोलावे लागत आहे. मुंबईत पेंग्विन आणल्यानंतर भाजपची नेते मंडळी आदित्य ठाकरे यांना ‘युवराज’ आणि ‘पेंग्विन’ संबोधू लागले आहेत. आता गुजरातमधील अहमदाबादमध्येही पेंग्विन आणले आहेत. मग भाजपा नेते आशिष शेलार आणि अतुल भातखळकर यांना ‘गुजरातचे पेंग्विन’ म्हणायचे का, असा टोला महापौर किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

‘गुजरातच्या सायन्स सिटीपेक्षा राणी बाग स्वस्त’

मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण कोरियातून आठ पेंग्विनचे आगमन झाले. काही कालावधीनंतर त्यापैकी एका पेंग्विनचा मृत्यू झाला. तुलनेने मुंबईत पेंग्विन कक्षासाठी १७ कोटी रुपये खर्च आला आहे. तसेच प्रतीमाणशी २५ ते ५० रुपये प्रवेश शुल्क भरून संपूर्ण राणीच्या बागेची सफर करता येते. शाळेतील मुलासाठी ५० रुपये प्रवेश शुल्क घेतले जाते. त्या शुल्कात सर्व प्राणी पहाता येतात. राणीच्या बागेत दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येतो. राणीच्या बागेत २४ तास तज्ज्ञ डॉक्टर, कर्मचारी तैनात असतात. गुजरातच्या सायन्स सिटीपेक्षा मुंबईतील राणीची बाग स्वस्त आहे. आम्ही इथे थोडी शुल्कवाढ केली तर लगेच गळा काढतात, असा टोला महापौरांनी भाजपाला लगावला.

The post शिवसेना-भाजपमध्ये पुन्हा पेंग्विनवरून वाद appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/d6CiLDEqB
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.