Type Here to Get Search Results !

मारहाणीच्या आरोपातून फेरीवाल्याची निर्दोष सुटका

पोलिसाच्या साक्षीवर न्यायालयाचे प्रश्नचिन्ह

मुंबई : पोलिसाला मारहाण केल्याच्या आणि शिवीगाळ केल्याच्या आरोपातून पदपथावर चपला विकणाऱ्या २४ वर्षांच्या विक्रेत्याची सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष सुटका केली. संबंधित पोलिसाने दिलेल्या साक्षीवर प्रश्न उपस्थित करत, तसेच अशा प्रकारे एखाद्याला गोवण्यात येणे नवीन नाही, असे निरीक्षणही न्यायालयाने या फेरीवाल्याची निर्दोष सुटका करताना प्रामुख्याने नोंदवले.

घटनेच्या वेळी पदपथावरील बेकायदा फेरीवाल्यांना हटवण्याची जबाबदारी तक्रारदार पोलिसावर सोपवण्यात आल्याचा कुठलाही पुरावा न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही वा स्वतंत्र साक्षीदारही तपासण्यात आलेला नसल्याचेही न्यायालयाने आदेशात म्हटले.

पोलिसांच्या तक्रारीनुसार ऑक्टोबर २०१६ मध्ये पोलीस नाईक प्रसाद पोखरणकर हे दक्षिण मुंबईत मोबाइल व्हॅनवर तैनात होते. त्या वेळी पदपथावर करीम खोजा चपला विकत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यांनी त्याच्याकडे परवान्याबाबत विचारणा केली असता तो नसल्याचे उघड झाले. त्यामुळे खोजाला पोलीस ठाण्यात येण्यास सांगण्यात आले. मात्र खोजाने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने पोखरणकर यांना शिवीगाळ करून त्यांना धक्का दिला. पोखरणकर यांच्या तक्रारीनंतर खोजावर सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणण्याच्या आरोपांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. 

बेकायदा फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचा अधिकार पालिकेला आहे. तसेच कारवाईसाठी गरज भासल्यास पालिका पोलिसांची मदत घेऊ शकते. त्यामुळे पोखरणकर यांच्याकडून केलेली तक्रार खोटी असल्याचा दावा खोजातर्फे करण्यात आला.

न्यायालयानेही खोजातर्फे करण्यात आलेला युक्तिवाद मान्य केला. तसेच तक्रारीचे समर्थन करणारा पुरावा वा स्वतंत्र साक्षीदार नाही. थोडक्यात खोजाने पोखरणकर यांना मारहाण केल्याचा, तसेच पोखरणकर यांना फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार होते हे सिद्ध करण्यात पोलिसांना अपयश आल्याचे न्यायालयाने नमूद केले.

पोलिसांचा दावा न पटण्यासारखा

न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे लक्षात घेता घटनास्थळी तक्रारदार पोलिसाचे असणे हे संशयास्पद वाटते. शिवाय तक्रारदाराला फेरीवाल्यांवर कारवाई करण्याचे अधिकार देण्यात आल्याचा कोणताही पुरावा नाही, याकडे न्यायालयाने लक्ष वेधले, त्याचप्रमाणे साधा चप्पल विक्रेता सक्षम पोलिसावर सूड उगवेल हे आणि तक्रारदार व आरोपीची शरीरयष्टी लक्षात घेता आरोपीने तक्रारदाराला मारहाण केल्याचे पटण्यासारखे नाही. एकूणच सगळे संशयास्पद वाटत असल्याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला.

The post मारहाणीच्या आरोपातून फेरीवाल्याची निर्दोष सुटका appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3l1whHP
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.