मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मशीद बंदर रेल्वे स्थानकांदरम्यानचा १५४ वर्षे जुना कर्नाक उड्डाणपूल पाडण्यासाठी २७ तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवार, २० नोव्हेंबर रोजी उपनगरीय सेवा मुख्य मार्गावर भायखळय़ापर्यंत, तर हार्बर मार्गावर वडाळय़ापर्यंतच सुरू राहील. तर लांब पल्ल्याच्या ३६ गाडय़ाही रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.
मध्य रेल्वे मार्गावरील ब्रिटिशकालीन कर्नाक बंदर उड्डाणपूल धोकादायक बनला असून तो पाडण्याचे काम १९ नोव्हेंबरला रात्री ११ वाजता सुरू होणार असून २१ नोव्हेंबरला मध्यरात्री २पर्यंत हे काम चालेल. परिणामी या काळात सीएसएमटी ते भायखळा आणि वडाळादरम्यानची उपनगरीय सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे कसारा, खोपोली येथून येणाऱ्या लोकल भायखळा, परेल, दादर आणि कुर्ल्यापर्यंत चालवण्यात येतील. येथूनच लोकल सोडण्यात येतील. तर हार्बरवर पनवेल येथून येणाऱ्या लोकल वडाळापर्यंत चालवण्यात येणार असून येथूनच पुन्हा डाउन दिशेला सुटतील. या काळात काही लोकल फेऱ्या रद्द केल्या जातील, तर वातानुकूलित लोकल फेऱ्या उपलब्ध नसतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, मेगाब्लॉकमुळे ३६ मेल-एक्स्प्रेस गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईत १९ नोव्हेंबर रोजी येणारी पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, हुसेन सागर एक्सप्रेस, देवगिरी एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, नांदेड राज्यराणी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेस या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत. २० नोव्हेंबर रोजी मुंबई-नांदेड तपोवन, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी, मुंबई-जालना जनशताब्दी, मुंबई-मनमाड विशेष गाडी, मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस, मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेससह अन्य काही लांब पल्ल्याच्या गाडय़ाही रद्द करण्यात आल्या आहेत.
मडगाव कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस १९ आणि २० नोव्हेंबर रोजी मुंबईऐवजी पनवेल येथून सुटतील, तर काही गाडय़ा दादर, तसेच पुण्यातून सोडण्यात येणार आहेत. मुंबईला येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेस, हावडा, फिरोजपूरसह, इंद्रायणी एक्स्प्रेस, मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, कोकणकन्या एक्स्प्रेस यासह अन्य गाडय़ा दादर आणि पनवेलपर्यंतच चालवण्यात येणार आहेत.
सेवेवर परिणाम
- कसारा, खोपोलीहून येणाऱ्या लोकल भायखळा, परळ, दादर, कुर्ल्यापर्यंत
- पनवेलहून येणाऱ्या लोकल वडाळय़ापर्यंत
- हार्बरवर मार्गावरील काही फेऱ्या रद्द
- सर्व वातानुकूलित लोकल रद्द
पार्श्वभूमी..
कर्नाक उड्डाणपूल १८६८ साली बांधण्यात आला होता. रेल्वे हद्दीतील कर्नाक उड्डाणपूल ५० मीटर लांब आणि १८ मीटर रुंद आहे. त्याला तडे गेले आहेत. पायाही खराब झाला आहे आणि खांबालाही तडे गेले आहेत. तो २२ ऑगस्टपासून वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर २ सप्टेंबरपासून रेल्वे हद्दीतील किरकोळ पाडकामाला सुरुवात करण्यात आली. आता हा संपूर्ण पूल पाडण्यात येणार आहे.
from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/8UFxKEN
via IFTTT