Type Here to Get Search Results !

Dasara Melava: ‘काल रात्री या…’; शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच मिलिंद नार्वेकरांनी शेअर केले फोटो

दसरा अवघ्या दोन दिवसांवर आलेला असतानाच शिवसेना आणि शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची जोरदार तयारी सुरु असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. शिवसेनेनं दादरमधील शिवाजी पार्क येथे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाने वांद्रे-कुर्ला संकुलामधील एमएमआरडीच्या मैदानामध्ये दसरा मेळाव्याचं आयोजन केलं आहे. या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने दोन्ही बाजूने शक्तिप्रदर्शनाची जोरदार तयारी सुरु आहेत. असं असतानाच दुसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक आणि पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर शिंदे गटात जाण्याच्या चर्चाही सुरु आहेत. मागील काही दिवसांपासून या चर्चांनी जोर धरलेला असतानाच रविवारी रात्री मिलिंद नार्वेकर यांनी ‘शिवतीर्था’वर हजेरी लावली.

नक्की वाचा >> Shinde vs Thackeray: शिवसेनेचे तीन खासदार, चार आमदार शिंदे गटाच्या वाटेवर? उद्धव ठाकरेंना आणखीन एक धक्का?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर असून तेथे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होत आहे. शिवसेनेमध्ये उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दसरा मेळावा होत आहे. त्यातच खरी शिवसेना कोणाची यावरुन न्यायालयीन वाद सुरु असतानाच उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाकडूनही आपला मेळावा हा शिवसेनेचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. असं असतानाच उद्धव यांचे निकटवर्तीय नार्वेकरही शिंदे गटाच्या वाटेवर असल्याच्या जोरदार चर्चा आहेत.

मुख्यमंत्री शिंदे गणपतीनिमित्त नार्वेकर यांच्या निवासस्थानी जाऊन गणरायाचं दर्शन घेऊन आले होते. त्यानंतर नार्वेकरही शिंदे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. अजूनही राजकीय वर्तुळामध्ये या चर्चांना उधाण आल्याचं चित्र दिसत आहे. असं असतानाच रविवारी म्हणजेच ज्या दिवसापासून ‘शिवतीर्था’वर ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्याचं काम सुरु झालं आहे त्या दिवसापासून नार्वेकर या कामावर लक्ष ठेऊन आहेत. रात्री साडेदहा वाजता नार्वेकर स्वत: ‘शिवतीर्था’वर पोहोचले होते.

नक्की वाचा >> थंड पाण्याची बाटली, लोणावळ्यातील हॉटेल अन् थेट CM शिंदेंच्या हत्येचा कट रचल्याचा फोन; ‘त्या’ कॉलमागील खरा घटनाक्रम

मिलिंद नार्वेकरांनी ‘शिवतीर्था’वरील दसरा मेळाव्याच्या तयारीची पहाणी केली. काल रात्री साडेदहा वाजता नार्वेकर ‘शिवतीर्था’वर पोहोचले आणि कामाची पहाणी करताना दिसले. त्यांच्या या भेटीचे काही फोटो, व्हिडीओ समोर आले आहेत. ज्या ठिकाणी मंच उभारला जातोय तिथे उभे राहून नार्वेकर कामाची पहाणी करताना दिसत आहेत. नार्वेकर यांनीच ट्वीटरवरुन काही फोटो शेअर करत ही माहिती दिली आहे. “५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या शिवसेनेच्या पारंपरिक दसरा मेळाव्याची ‘शिवतीर्था’वर जय्यत तयारी सुरू असून काल रात्री या कामाची पाहणी केली,” असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

एका बाजूला नार्वेकर शिंदे गटात जाण्याची चर्चा असतानाच दुसरीकडे ते मात्र शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची तयारी करताना दिसत आहेत.



from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/FX2KDjm
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.