Type Here to Get Search Results !

आरेतील ‘तो’ बिबट्या लवकरच जेरबंद होणार ; स्थानिकांच्या मागणीनुसार पिंजरे, सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार

मुंबई : गोरेगावमधील आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक १५ येथे बिबट्या हल्ल्यात दीड वर्षांच्या बालिकेचा मृत्यू झाल्यानंतर हल्ला करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी जोर धरू लागली असून वनविभागाने या बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार युनिट १५ च्या परिसरात दोन पिंजरे लावण्यात येणार असून यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे. त्याच वेळी बिबट्याच्या हालचाली टीपण्यासाठी या परिसरात २२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचाही निर्णय घेण्यात आला असून यापैकी १२ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. उर्वरित १० कॅमेरे लवकरच बसविण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> माथेरानमध्ये लवकरच ‘चाकावरचे उपहारगृह’ सुरू होणार ; दादर, एलटीटी, कल्याणमध्येही सेवा उपलब्ध करणार

आरेतील युनिट १५ मध्ये सोमवारी दीड वर्षांची मुलगी इतिका लोट हिच्यावर बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्यात तिचा मृत्यू झाला. दिवाळीनिमित्त मंदिरात दिवे लावण्यासाठी इतिकाची आई सोमवारी सकाळी सहा – साडेसहाच्या सुमारास जात होती. तिच्या मागोमाग इतिकाही गेली. झाडीत लपलेल्या बिबट्याने इतिकावर झडप घातली आणि तिला ओढत दूर नेले. कुटुंबिय आणि रहिवाशांनी इतिकाची बिबट्याच्या तावडीतून सुटका केली आणि तिला तात्काळ सेवन हिल्स रूग्णालयात नेले. मात्र डाॅक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर आरे परिसरात शोककळा पसरली असून रहिवाशी संतप्त झाले आहेत. या बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांनी वनविभागाकडे केली आहे. रहिवाशांची  मागणी लक्षात घेऊन बिबट्याला जेरबंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उप वन संरक्षक, ठाणे, संतोष सस्ते यांनी दिली.

हेही वाचा >>> म्हाडातील बदल्यांबाबत उपमुख्यमंत्र्यांचा आदेश धाब्यावर?

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी आरेतील युनिट क्रमांक १५ ते आदर्शनगर या पट्ट्यात २२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आतापर्यंत यापैकी १२ सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून उर्वरित १० कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे. त्याच वेळी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी या परिसरात दोन पिंजरे लावण्यात येणार आहेत. मात्र पिंजरे लावण्यासाठी काही परवानग्या घ्याव्या लागतात. या परवानग्या मिळाल्यानंतरच पिंजरे लावण्यात येतील. यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल, असेही सस्ते यांनी सांगितले. दरम्यान, आरेमध्ये जंगल असून तेथे बिबट्याचा अधिवास आहे. त्यामुळे या परिसरात वावरताना नागरिक, रहिवाशांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळी घराबाहेर पडू नये, लहान मुले बाहेर जाऊ नये याची काळजी घ्यावी, आपला परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन सस्ते यांनी येथील रहिवाशांना केले आहे. यापूर्वी सी-३२ या मादी बिबट्याने अनेकांवर हल्ला केला होता. त्यानंतर या बिबट्या मादीला जेरबंद करण्यात आले होते.



from Mumbai Marathi News, Latest Mumbai News in Marathi, Mumbai Breaking Headlines & Updates | मुंबई मराठी बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/bDY1HO8
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.