मुंबई : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी शनिवारी मुंबई भेटीत सर्व सुरक्षेचा आढावा घेतला. सुरक्षेसंदर्भात कोणते उपाय योजण्यात यावेत यावर त्यांनी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. मुंबईत घातपात करण्याच्या आलेल्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर डोभाल यांचा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.धमक्या आल्यापासून मुंबईसह देशातील इतर महत्त्वाच्या शहरांमध्ये सावधानतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. तसेच श्रीवर्धन येथे संशयित ‘लेडी हान’ बोटीवर सापडलेल्या तीन एके-४७ रायफली आणि शस्त्रास्त्रे यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष आहेत. ही बोट एका ऑस्ट्रेलियन महिलेच्या मालकीची आहे. या पार्श्वभूमीवर डोभाल यांनी सागरी सुरक्षा अधिक कडक करण्याबरोबरच कोणते उपाय योजण्यात यावेत याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या.
डोभाल यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याबरोबर ‘वर्षां’ या निवासस्थानी सुमारे पाऊण तास चर्चा केल्यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्याशीही चर्चा केली. त्यानंतर राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांबरोबर घेतलेल्या बैठकीत सागरी सुरक्षा, किनारपट्टीवरील गस्त व संशयास्पद हालचाली दिसून आल्यास केंद्रीय यंत्रणांशी संपर्क करणे, गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी अशा सणासुदीच्या काळात घातपाताचे प्रकार होणार नाहीत, यासाठी सावधगिरी बाळगणे, आदी बाबींवर चर्चा केली. सर्व यंत्रणांना अधिक सतर्क राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/63WTuVZ
via IFTTT