मुंबई : आगामी मुंबई महापालिकेसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी भाजप मनसेचा वापर करणार आहे. मनसेशी युती करायची की छुपी आघाडी करायची, याबाबत वरिष्ठ भाजप नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यात विचारविनिमय सुरू आहे.
मनसेने परप्रांतीयांविरोधातील भूमिका मवाळ करून हिंदूत्वाचा सुरू केलेला गजर भाजपसाठी अनुकूल असला तरी युती केल्यास उत्तर भारतीय मतदार नाराज होण्याची चिंता भाजपला आहे. त्यामुळे मनसेशी छुपी युती करून शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्याची रणनीती भाजपने तूर्तास ठरविली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी सोमवारी तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसेने महापालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची व मुंबईत किमान १०० जागा लढण्याची तयारी सुरू केली आहे.
भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चेनंतर राज ठाकरे यांनी परप्रांतीयांविरोधातील भूमिका मवाळ केली. तरीही मनसेशी युती केल्यास अधिक फायद्याचे होईल की काही जागांवर मनसेला छुपा पाठिंबा देवून अधिक उपयोग होईल, याबाबत भाजपने काही संस्थांच्या मदतीने सर्वेक्षणे सुरू केली आहेत. काँग्रेस, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढण्याची शक्यता असल्याने भाजप व मनसे स्वतंत्र लढल्यास शिवसेनेची मते फोडता येतील, असे वरिष्ठ भाजप नेत्यांना वाटत आहे. एकनाथ शिंदे गट शिवसेनेतून फुटून निघण्यामागे भाजपचे कारस्थान आहे आणि त्यावरून जनतेमध्ये असलेल्या नाराजीतून सहानुभूती मिळविण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्याला शह देण्यासाठी आणि मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप मनसेचा उपयोग करून घेणार आहे. युती केल्यास भाजपची काही मराठी मते वाढतील, पण अमराठी मतांना फटका बसणार नाही, यासाठी भाजपला काळजी घ्यावी लागणार आहे. शिवसेनेशी युती असताना व शिवसेनेची भूमिकाही परप्रांतीयांविरोधातील असताना भाजपला फटका बसला नाही, तर मनसेशी युती केल्यानेही बसणार नाही, असेही एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/ve7MnJD
via IFTTT