Type Here to Get Search Results !

पानसरे हत्या प्रकरण : तपास ‘एटीएस’कडे वर्ग करण्यास आक्षेप नाही ; राज्य सरकारचा दावा

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास राज्याच्या दहशतवादी विरोधी पथकाकडे (एटीएस) देण्यास कोणताही आक्षेप नसल्याचे राज्य सरकारने सोमवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यावर एटीएस अधिकाऱ्यांपैकी एखाद्या अधिकाऱ्याचा ‘एसआयटी’मध्ये समावेश करता येईल का, अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. तसेच याबाबत बुधवापर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले.

महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या विशेष तपास पथकातर्फे (एसआयटी) या प्रकरणाचा तपास केला जात असून पानसरे कुटुंबीयांनी त्याबाबत असमाधान व्यक्त केले होते. तसेच तपास एटीएसकडे वर्ग करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने पानसरे कुटुंबीयांच्या मागणीची यापूर्वी झालेल्या सुनावणीदरम्यान दखल घेऊन पानसरे यांची हत्या करणाऱ्या मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यात विशेष तपास पथक अपयशी ठरले आहे. त्यामुळे प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्याच्या पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवर राज्य सरकारला काही तरी निर्णय घ्यावाच लागेल, असे सरकारला सुनावले होते. त्याचबरोबर पानसरे कुटुंबीयांच्या मागणीवरील निर्णयाबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले होते.

न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठासमोर सोमवारी या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी महाराष्ट्र गुन्हे अन्वेषण विभागाच्या प्रमुखांचे पत्र न्यायालयात सादर करून एटीएसदेखील राज्य सरकारचीच तपास यंत्रणा असून पानसरे हत्या प्रकरणाचा तपास एटीएसकडे वर्ग करण्यास सरकारचा काहीच आक्षेप नसल्याचे विशेष सरकारी वकील अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने तपास वर्ग केला नाही तर एसआयटीची रचना बदलण्याची तयारीही मुंदरगी यांनी दाखवली.

एटीएसकडून शोध..

पानसरे, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर, कन्नड अभ्यासक एम. एम. कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या तपासात एटीएसनेच धागेदोरे शोधले होते. एटीएसने २०२० मध्ये औरंगाबाद शस्त्रसाठा प्रकरणात काहीजणांना अटक केली होती. त्यातून या चारही हत्यांचे सूत्रधार सारखेच असल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच फरारी आरोपी सारंग अकोलकर आणि विनय पवार यांनीच पानसरे यांच्यावर गोळीबार केल्याचे त्यातील आरोपींच्या चौकशीत उघड झाले होते, असे पानसरे कुटुंबीयांतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर या सर्व प्रकरणांमध्ये एक समान धागा आहे हे आमचेही म्हणणे आहे. त्याचवेळी फरारी आरोपींना कोणतीही तपास यंत्रणा शोधू शकलेली नाही हेही आम्ही नाकारलेले नाही, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/KbDw9EV
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.