संदीप आचार्य
मुंबई : ज्या वेगाने प्रत्यारोपण शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना अवयव मिळण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे, त्या वेगाने अवयवदान चळवळ भारतात आजही वाढू शकलेली नाही. गंभीर बाब म्हणजे मेंदूमृत (कॅडेव्हर) अवयवदान चळवळ वाढावी, यासाठी शासनस्तरावरून म्हणावे तसे प्रयत्न होत नसल्यामुळे हृदय, मुत्रिपिंड, यकृत, फुफ्फुस आदी अवयवदान न झाल्याने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांचे म्हणणे आहे. देशात शस्त्रक्रियेसाठी २०२२मध्ये एक लाख ३३ हजार ३१९ रुग्णांनी अवयव मिळावे, यासाठी नोंदणी केली असता केवळ दोन टक्के रुग्णांनाच कॅडेव्हर डोनेशनच्या माध्यमातून अवयव मिळाले आहेत.
केंद्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, २०२२मध्ये देशभरात शस्त्रिक्रेसाठी अवयव मिळावे, यासाठी एक लाख ३३ हजाराहून अधिक रुग्णांनी विविध रुग्णालयांमध्ये नोंदणी केली होती. त्यापैकी १६,०४६ रुग्णांचीच केवळ अवयव प्रत्यारोपण शस्त्रिक्रया होऊ शकली, तर मेंदूमृत (कॅडेव्हर) रुग्णांनी केलेल्या अवयवदानातून केवळ २३९२ रुग्णांच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया होऊ शकल्या. हे प्रमाण केवळ दोन टक्के एवढे आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील एच.एन.रिलायन्स रुग्णालयाने मंगळवारी हृदयप्रत्यारोपण दिवस साजरा करून जनजागृतीचा उपक्रम हाती घेतला आहे. रुग्णालयाचे हृदशल्य चिकित्सा विभाग व हृदयप्रत्यारोपण विभागाचे संचालाक डॉ. अन्वय मुळे म्हणाले, हृदय प्रत्यारोपण वा अन्य अवयव प्रत्यारोपणासाठी अवयवदान चळवळ व्यापक होणे गरजेचे आहे. शासनस्तरावर यासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे असून कॅडेव्हर डोनेशनसाठी व्यापक जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. एक मेंदूमृत रुग्ण आठ प्रकारचे अवयवदान करू शकतो. यामुळे अनेक गरजू रुग्णांचा जीव वाचू शकतो. वैद्यकीय तंत्रज्ञान वाढत असल्यामुळे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून असंख्य रुग्णांना उत्तम आरोग्य लाभू शकते. मात्र, यासाठी अवयवदान चळवळ व्यापक होण्याची गरज आहे.
सुमारे ५० वर्षांपूर्वी मुंबईतील केईएम रुग्णालयात हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तथापि ही शस्त्रक्रिया यशस्वी होऊ शकली नाही. त्यानंतर जवळपास ४७ वर्षांनंतर मुलुंड येथील फोर्टिज रुग्णालयात डॉ. मुळे यांनी मुंबईतील पहिली यशस्वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया एका २५ वर्षांच्या तरुणावर केली होती. तेव्हापासून आजपर्यंत डॉ. मुळे यांनी १५० हून अधिक हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे केल्या आहेत.
गेल्या दोन दशकात हृदयविकाराच्या झटक्यामुळे मरण पावणाऱ्यांची संख्या वेगाने वाढत असून यात तरुणांचे प्रमाण लक्षणीय आहे. जवळपास ५० टक्के रुग्ण हे ५० वर्षे वयोगटातील असून यातील २५ टक्के रुग्ण हे चाळीशीखालील असल्याचे केईएम रुग्णालयाच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. अजय महाजन यांनी सांगितले. ह्रदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची गरज असलेल्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असून ही शस्त्रक्रिया अत्यंत खार्चिक असल्याने खासगी रुग्णालयातच ही शस्त्रक्रिया प्रामुख्याने केली जाते. २०२२मध्ये मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी मूत्रपिंडाची गरज असलेल्यांची संख्या ९० हजार ३११ एवढी होती, तर यकृत प्रत्यारोपणासाठी ११ हजार ३३६ रुग्णांची नोंद प्रतिक्षा यादीत होती. या पार्श्वभूमीवर प्रत्यारोपणासाठी हृदयाची आवश्यकता असलेल्या रुग्णांची संख्याही वेगाने वाढलेली दिसते. जवळपास ३३४७ रुग्ण हृदय प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत तर देशभरात प्रत्यारोपण शस्त्रक्रयेसाठी एकूण ८१० हृदय उपलब्ध झाल्याची नोंद आहे.
राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिनानिमित्त एच.एन.रिलायन्स रुग्णालयाने आगामी सात दिवस म्हणजे ४ ते ११ ऑगस्ट या कालावधीत मोफत हृदयचिकित्सा शिबिराचे आयोजन रुग्णालयात केले असून दुपारी तीन ते सहा यावेळात गरजू रुग्णांची मोफत हृदय तपासणी केली जाणार आहे. मुंबईतील हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेचा विचार करता २०१५ पासून आतापर्यंत १७१ रुग्णांनी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हृदयदान केल्याची नोंद आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/WjncHuK
via IFTTT