मुंबई : अंधेरीतील सार्वजनिक कार्यक्रमात मुंबईच्या विकासात देशातील काही समाजबांधवांच्या योगदानाचे कौतुक करताना माझ्याकडून कदाचित काही चूक झाली, अशी कबुली देत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माफीनामाच सादर केला.
राजस्थानी आणि गुजराती भाषिकांना मुंबईतून बाहेर काढले तर मंबईत पैसेच शिल्लक राहणार नाहीत, असे वादग्रस्त विधान राज्यपाल कोश्यारी यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात केले होते. त्यावरून सर्वच राजकीय पक्षांनी कोश्यारी यांच्यावर टीका केली होती. कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही असल्याने त्यांना राज्यपालपदावरून हटवावे, अशी मागणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यपालांच्या विधानाशी सहमत नाही, असे स्पष्ट केले होते. भाजपनेही कोश्यारी यांच्या विधानाचे समर्थन करण्याचे टाळले होते. टीका होताच आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा राज्यपालांनी केली होता. पण, सोमवारी राज्यपालांनी एका निवेदनाद्वारे चूक झाल्याचे कबूल करीत चक्क माफीनामाच सादर केला. दिल्लीतील भाजप नेत्यांनी कानपिचक्या दिल्यानेच कोश्यारी यांनी चुकीची कबुली दिल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्रच नाही तर संपूर्ण देशाच्या विकासात सर्वाचेच उल्लेखनीय योगदान आहे. विशेषत: संबंधित राज्याची सर्वसमावेशकता व सर्वाना बरोबर घेऊन वाटचाल करण्याची आपली उज्वल परंपरा यामुळेच आज आपला देश प्रगतीपथावर आहे. गेल्या जवळपास तीन वर्षांत मला राज्यातील जनतेचे अपार प्रेम मिळाले आहे. आपल्या वतीने मी महाराष्ट्र आणि मराठी भाषेचा गौरव वाढवण्याचा कसोशीने प्रयत्न केला, असे राज्यपालांनी निवेदनात म्हटले आहे.
भाषणात माझ्याकडून निर्हेतुकपणे काही चूक झाली असेल तर त्या चुकीला या थोर महाराष्ट्र राज्याचा अवमान समजला जाईल, ही कल्पनाही मला करवत नाही. महाराष्ट्राच्या महान संतांच्या शिकवणीला अनुसरून राज्यातील जनता या विनम्र राज्यसेवकाला क्षमा करून आपल्या विशाल अंत:करणाचा पुनप्र्रत्यय देईल, असा विश्वास आह़े
-भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/ZFCv671
via IFTTT