मुंबई : करोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरही एसटी महामंडळाची वाहतूक पूर्वपदावर येऊ शकलेली नाही. मंडळाच्या ताफ्यातील १५ हजार ८६९ गाडय़ांपैकी १३ हजार गाडय़ा सध्या सेवेत आहेत. नादुरुस्त बसगाडय़ांचे वाढलेले प्रमाण, नवीन बस गाडय़ांची रखडलेली खरेदी यामुळे महामंडळाचे नियोजन काहीसे फसले असून प्रवाशांची अडचण होत आहे. परिणामी, राज्यातील ग्रामीण भागात एसटीची सेवा अपुरी पडत असून प्रवाशांचे हाल होत आहेत. दरम्यान, पंधरा दिवसांत एसटी सेवा पूर्ववत होईल, असा दावा एसटी महामंडळाकडून करण्यात आला आहे.
करोनापूर्व काळात एसटीच्या ताफ्यात १८ हजार ६०० एसटी गाडय़ा होत्या आणि त्यातून दररोज ६० लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करीत होते. त्यावेळी एसटीला २२ कोटी रुपये उत्पन्न मिळत होते. मात्र करोनाकाळानंतर प्रवाशांची आणि गाडय़ांची संख्या कमी झाली आहे.
एसटी महामंडळाच्या मुंबई सेन्ट्रल येथील मुख्यालयात नुकताच यासंदर्भात आढावा घेण्यात आला. ताफ्यात नवीन गाडय़ा लवकरच दाखल करणे, नादुरुस्त बसची दुरुस्ती करुन सेवेत आणणे, ग्रामीण भागातील बस संख्या पूर्ववत करणे यावर चर्चा करण्यात आला. या बैठकीत एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने तसेच वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. वाहतूक विभागाला ग्रामीण भागातील एसटी सेवा पूर्ववत करण्याचे, तसेच विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये यादृष्टीने काळजी घेऊन बसगाडय़ांचे नियोजन करण्याची सूचना करण्यात आली आहे.
गेल्या चार वर्षांत नवीन बसगाडय़ा खरेदी केलेल्या नाही. त्यातच नादुरुस्त बसगाडय़ाची संख्या वाढत असून दुरुस्ती करुन त्या सेवेत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाकाळात शाळा बंद होत्या. त्यानंतर कमी अंतरावरील विद्यार्थ्यांसाठीच्या बस लांब पल्ल्याच्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्यांची सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या पंधरा दिवसांत राज्यातील एसटीची सेवा सुरळीत सुरू होईल.
शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ
साध्या १,२०० बस येणार
एसटीच्या ताफ्यात मालकीच्या आणि भाडेतत्त्वावरील साध्या बसगाडय़ा समाविष्ट करण्याचा निर्णय झाला होता. मात्र त्याला विलंब झाला आहे. एसटी महामंडळ स्वमालकीच्या साध्या ७०० गाडय़ा टाटा कंपनीकडून घेणार आहे. तर ५०० साध्या बस भाडेतत्त्वावर घेणार असून यातील ३२० बससाठी निविदा काढण्यात आली आहे. तर १८० बसची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या १,२०० साध्या बस येत्या सप्टेंबरपासून टप्प्याटप्यात ताफ्यात दाखल करण्याचे उद्दिष्ट असून त्यामुळे बसची संख्या वाढेल, असा विश्वास चन्ने यांनी व्यक्त केला.
कारण काय?
’दरवर्षी महामंडळाच्या ताफ्यातील हजारो बसची कालमर्यादा संपुष्टात येते आणि त्या भंगारात काढण्यात येतात.
’गेल्या चार वर्षांत कालमर्यादा संपलेल्या बस भंगारात काढण्यात आल्या. परंतु निधीचा अभाव आणि करोना संकटामुळे नवीन बस ताफ्यात दाखल करता आल्या नाहीत.
’त्यातच मोठय़ा प्रमाणावर बसगाडय़ा नादुरुस्त होत आहेत. परिणामी, ताफ्यातील १५ हजार ८६९ पैकी फक्त १३ हजार गाडय़ा प्रवाशांच्या सेवेत आहेत.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/EwcvDop
via IFTTT