Type Here to Get Search Results !

‘वेदांत-फॉक्सकॉन’चा राज्यात १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा विचार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा

मुंबई : ‘वेदांत समूह’ आणि ‘फॉक्सकॉन’ यांच्या भागीदारीतून महाराष्ट्रात तीन टप्प्यांत १ लाख ६६ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा प्रस्ताव राज्य सरकारसमोर मांडण्यात आला आहे.

या गुंतवणुकीतून २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील एक आणि विदर्भातील एक अशा दोन जागांचा प्रकल्पासाठी विचार सुरू आहे. ‘फॉक्सकॉन’ने  फडणवीस सरकारच्या काळात राज्यात ३० हजार कोटींची गुंतवणूक करण्याचे आश्वासन दिले होते. त्याचे कौतुकही झाले होते. पण कंपनीने नंतर पाठ फिरवली होती. यामुळे या वेळी तरी प्रत्यक्ष गुंतवणूक होण्याची राज्याच्या उच्चपदस्थांना अपेक्षा आहे.  ‘वेदांत ग्रुप’ आणि ‘फॉक्सकॉन’ कंपनीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे सचिव भूषण गगराणी, महाराष्ट्र  राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पी.अनबलगन, फॉक्सकॉनचे वेक्टर चेन, एरिक लिन, पिव्ही लिन, वेदांतचे सतेश अम्बरडर, प्रणव कोमेरवार, एॅवनस्टारचे ग्लोबल एम.डी हेब्बर उपस्थित होते. सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशन उत्पादनाला राज्यात प्रोत्साहन देण्यासाठी वेदांत कंपनीस गुंतवणुकीसाठी संपूर्ण सहकार्य दिले जाईल असे आश्वासन शिंदे यांनी बैठकीत दिले. वेदांतने तैवानच्या फॉक्सकॉन कंपनीसह भागीदारी केली असून या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे प्रस्तावित आहे. यात एक लाख कोटी रुपयांची गुंतवणूक असलेले डिस्प्ले फॅब्रिकेशन, ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमीकंडक्टर्स तसेच ३८०० कोटी रुपयांचा चाचणी प्रकल्प यांचा समावेश आहे. याबाबत एमआयडीसीशी प्राथमिक चर्चा सुरू झाली असून त्यांना पश्चिम महाराष्ट्रात तळेगाव तर विदर्भात बुटीबोरीच्या जागेचा पर्याय देण्यात आला आहे. या प्रकल्पांमधून सुमारे २ लाख जणांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार मिळेल, असे बैठकीतील सादरीकरणावेळी सांगण्यात आले.

राज्यात उद्योगवाढीसाठी आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हा उद्योग राज्यात यावा यासाठी केंद्र शासनातर्फे लागणारे सहकार्य देखील प्राप्त करून घेण्यात येणार आहे. हा उद्योग राज्यात आल्यास मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊन राज्याच्या एकूण सकल उत्पन्नात वाढ होण्यास मदत होणार आहे. या उद्योग उभारणीसाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही शिंदे  यांनी दिली.

तर यापूर्वी केवळ चार देशांत असलेला हा उद्योग राज्यात यावा ही इच्छा आहे. हा उद्योग राज्यासाठी महत्त्वाचा आहे. उद्योग उभारणीसाठी संपुर्ण सहकार्य केले जाईल, प्रकल्प पुर्ण होण्यासाठी देण्यात आलेल्या वेळेचे (टाइम लाइन) पालन व्हावे अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.

.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/f7DqZwa
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.