Type Here to Get Search Results !

मुंबईतील ३४ टक्के नागरिकांना उच्च रक्तदाब

मुंबईतील नागरिकांच्या जेवणात मीठाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून असून प्रतिदिन सरासरी ९ ग्रॅम मीठाचे सेवन करीत आहेत. परिणामी शहरातील १८ ते ६९ वयोगटातील सुमारे ३४ टक्के नागरिकांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे जागतिक आरोग्य संघटना आणि मुंबई महानगरपालिका यांच्यावतीने करण्यात आलेल्या ‘स्टेप’ सर्वेक्षणात आढळले आहे.

‘स्टेप’चे सर्वेक्षण मुंबईत तीन टप्प्यांमध्ये करण्यात येणार आहे. यातील दोन टप्पे २०२० मध्ये पार पडले. मुंबईतील १८ ते ६९ वयोगटातील सुमारे पाच हजार नागरिकांचे यामध्ये सर्वेक्षण करण्यात आले असून शहरातील सर्व भागांचा यात समावेश केलेला आहे. प्राथमिक पाहणीमध्ये शहरात असंसर्गजन्य आजारांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचे आढळले आहे. शहरात या वयोगटातील तीन नागरिकांपैकी एकाला उच्च रक्तदाबाची बाधा झाली आहे. याचे प्रमुख कारण मीठाचे अतिसेवन असल्याचे निदर्शनास आले आहे. सर्वसाधारणपणे मनुष्याला प्रतिदिन पाच ग्रॅम मीठ पुरेसे असते. परंतु मुंबईकरांच्या आहारात मीठाचा वापर सरासरी प्रतिदिन ९ ग्रॅम इतका असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे, असे मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्य आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले.

या अहवालाची प्राथमिक आकडेवारी आम्हाला मिळाली आहे. परंतु त्याचे विश्लेषण अजून झालेले नाही. यामध्ये उच्च रक्तदाबासह, मधुमेह, तंबाखूचा वापर, कर्करोग याबाबतची माहिती घरोघरी जाऊन घेण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये नागरिकांचे मधुमेह, उच्च रक्तदाबाची तपासणी, कमरेचा घेर, वजन, कोलेस्टोरॉल इत्यादीच्या नोंदीही केल्या आहेत, असे मुंबई महानगरपालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

तिसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण सप्टेंबरपासून –

या पार्श्वभूमीवर मुंबईतील ३० वर्षांवरील सर्व नागरिकांच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या तपासण्या करण्याची मोहीम मुंबई महानगरपालिका सप्टेंबरपासून सुरू करणार आहे. मोहीमेचा एक भाग म्हणून पालिकेच्या रुग्णालयांमध्येही तपासणीसाठी एक विशेष केंद्र सुरू केले जाईल. यामध्ये रुग्णासोबत येणाऱ्या नागरिकांच्याही तपासण्या करण्यात येणार आहेत.

गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये आरोग्य कर्मचारी आणि रुग्णालयांमध्ये इतर तपासणीसाठी येणारे रुग्ण यांच्या मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणीची मोहीम पालिकेने राबविली होती. परंतु यामध्ये ३० वर्षावरील सर्व नागरिकांचा समावेश केला नव्हता. या मोहीमेत मुंबईतील ३० वर्षावरील सुमारे ३० लाख नागरिकांच्या दोन्ही तपासण्या करण्यात येणार आहेत. तसेच घरोघरी सर्वेक्षण करताना या आजारांबाबत जनजागृतीही करण्यात येईल, असे पालिकेच्या असंसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. दक्षा शाह यांनी सांगितले.

माहिती डिजिटल स्वरूपात… –

संशयित रुग्ण, पाठपुरावा केलेले रुग्ण, उपचार ही सर्व माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने उपलब्ध केलेल्या सॉफ्टवेअरमध्ये भरण्यात येणार आहे. त्यामुळे ही सर्व माहिती डिजिटल स्वरुपातही जतन केली जाणार आहे.

कर्करोगाच्याही तपासण्या… –

मधुमेह आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांची निदान मोहीम पूर्ण झाल्यानंतर पुढील टप्प्यामध्ये कर्करोगाच्या प्राथमिक तपासण्या आणि सर्वेक्षण ही करण्यात येणार आहेत. यामध्ये तोंडाचा, स्तनाचा आणि गर्भाशयाच्या मुखाचा अशा तीन चाचण्यांच्या प्राथमिक तपासण्या केल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मीठाचे अतिसेवन टाळणे शक्य –

केवळ जेवणातून आपल्या शरीरात मीठ जाते असे नाही तर दिवसभरात अनेक पदार्थांमधून मीठ शरीरात जात असते. फरसाण, शेव, बेकरीचे पदार्थ, रेडी टू ईट, रेडी टू मेक या पदार्थामधून मीठाचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. रेल्वेमध्ये टाईमपास म्हणून विकले जाणारे पापड, चकली, तेलकट पदार्थ यामध्ये मोठ्या प्रमाणात मीठ असते. या सर्व पदार्थांच्या सेवनाचे प्रमाण कमी करणे गरजेचे आहे. तरच दुष्परिणाम टाळणे शक्य होईल, असे आहारतज्ज्ञ डॉ. रत्नाराजे थर यांनी सांगितले आहे.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/B3EYl2z
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.