मुंबई : जूनमध्ये वाऱ्याचा वेग कमी असल्याने, तसेच किनारपट्टीवरील कमी दाबाचा पट्टा क्षीण झाल्यामुळे पावसाचा जोर कमी आहे. जुलैमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता असल्याने पाऊस मोठे खंड घेऊन पडेल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये मात्र जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
यंदा पावसाची सुरुवात खूप संथगतीने झाली. काही काळ दडी मारलेल्या पावसाचा जोर काहीसा वाढला असला, तरी ही परिस्थिती काही काळच राहणार आहे. त्यानंतर जुलैमध्ये पाऊस मोठमोठे खंड घेऊन पडेल, असा अंदाज आहे. राज्यातील तीन ते चार जिल्हे सोडले तर, उर्वरित जिल्ह्यांत सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे. फक्त कोकणात तो सरासरीच्या आसपास पडला. केरळ, कर्नाटकात पावसाची कामगिरी खराब आहे. या दोन्ही राज्यांत पावसाची तूट दिसून येत आहे. अशीच परिस्थिती जुलैमध्येही असेल.
वाऱ्याचा वेग मंदावल्याने जूनमध्ये पावसात खंड पडला. जूनच्या अखेरच्या आठवडय़ात काहीसा चांगला पाऊस पडण्याचा अंदाज आहे. त्यानंतर १५ जुलैपर्यंत पाऊस मोठे खंड घेऊन पडण्याची शक्यता आहे. तर, जुलैच्या दुसऱ्या आठवडय़ापासून ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्येही पावसाचे प्रमाण चांगले राहील, अशी माहिती ज्येष्ठ कृषी हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी दिली.
राज्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. तर, शहरी भागातील नागरिकांना पाणी टंचाईचा प्रश्न भेडसावू लागला. धरणांतील पाणीसाठा आटल्याने धास्ती वाढली आहे. दरम्यान, मार्च, एप्रिल, मे महिन्यांचा अभ्यास केला असता, वाऱ्यांचा मंदावलेला वेग, कमी दाबाच्या क्षेत्राचा अभाव यामुळे पावसाची स्थिती समाधानकारक राहिली नाही, असे हवामान अभ्यासकांनी सांगितले.
राज्यात पाऊस कमीच
केरळमध्ये सुमारे ५९ टक्के आणि कर्नाटकात सुमारे २६ टक्के पावसाची कमतरता जाणवली आहे. देशांत केरळ आणि कर्नाटकात सर्वात आधी मोसमी पावसाचे आगमन होते. मात्र, यावर्षी तमिळनाडूत सर्वाधिक पाऊस पडला. राज्यात सुमारे ५४ टक्के पावसाची कमतरता आढळली आहे.
मुंबईकडे पाठ
मुंबई : कोकणात मुसळधारांचा आणि राज्यात पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज होता. गेल्या २४ तासांत कोकणातील काही भागांत मुसळधार, तर काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. मात्र मुंबई शहर कोरडेच आहे. रविवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत सांताक्रूझ येथे ०.५ मिमी आणि कुलाब्यात ०.१ मिमी पावसाची नोंद झाली.
अंदाज काय?
’दक्षिण कोकणाच्या काही भागांत गेल्या २४ तासांत २५० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद.
’रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्रात पुढील पाच दिवस कमी-अधिक प्रमाणात पावसाची शक्यता. ’येत्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत ऊन-सावल्यांचा लपंडाव.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/9C2TSEO
via IFTTT