मुंबई : कुर्ला येथील इमारत पडून झालेल्या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा विषय ऐरणीवर आला असून अद्याप १८७ धोकादायक इमारती रिकाम्या झालेल्या नाहीत. मुंबईतील एकूण ३३७ खासगी धोकादायक इमारतींपैकी २९ इमारती पाडून टाकण्यात पालिकेला यश आले असून ३०८ इमारती अजूनही उभ्या आहेत. त्यापैकी १८७ इमारतींमध्ये अजूनही नागरिकांचे वास्तव्य आहे. तर १३२ इमारतींची प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. या इमारतींमधून शेकडो नागरिक जीव धोक्यात घालून राहत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही पालिकेने पावसाळय़ापूर्वी मुंबईतील खासगी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले. शहर व उपनगरातील सर्व खासगी व पालिकेच्या मालकीच्या इमारतींचे सर्वेक्षण केले जाते. त्यात ज्या इमारती तत्काळ पाडून टाकणे आवश्यक आहे अशा इमारती सी-वन या प्रकारात अर्थात अतिधोकादायक म्हणून गणल्या जातात. यंदाच्या सर्वेक्षणात मुंबईत ३३७ इमारती धोकादायक आढळल्या होत्या. गेल्या वर्षी मुंबईत ४६२ इमारती धोकादायक होत्या. त्यापैकी गेल्या वर्षभरापासून आतापर्यंत १३६ इमारती पाडून टाकण्यात पालिकेला यश आले आहे.
चार वर्षांपूर्वी मुंबईत तब्बल ६१९ अतिधोकादायक इमारती आढळून आल्या होत्या. त्यानंतर ही संख्या दरवर्षी कमी होऊ लागली आहे. धोकादायक इमारतींपैकी काही इमारती पाडून टाकण्यात आल्या. काही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. काही इमारतींवरील कारवाईला न्यायालयाने स्थगिती आदेश दिला आहे. त्यामुळे अनेक इमारतींची नावे गेल्या अनेक वर्षांपासून तशीच आहेत. त्यात एफ उत्तर विभागातील पंजाब कॉलनीतील २५ इमारतींचा समावेश आहे. पालिकेच्या धोरणानुसार ३० वर्षे जुन्या इमारतींची संरचनात्मक तपासणी केली जाते. त्यात ज्या इमारती धोकादायक आढळतात, अशा इमारतींना घरे रिकामी करण्यासाठी ३५४ ची नोटीस बजावली जाते. त्यानुसार यंदाही पालिकेने धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण केले आहे व या इमारतींना नियमानुसार नोटिसाही धाडण्यात आल्या आहेत. मात्र इमारत धोकादायक ठरवण्यावर रहिवाशांचे काही आक्षेप असले की रहिवासी न्यायालयात धाव घेतात किंवा त्यांना इमारत धोकादायक वाटत नसेल तर ते पालिकेच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे जातात. त्यामुळे या इमारती तशाच अवस्थेत राहतात. एखाद्या इमारतीबाबत न्यायालयाने स्थगिती आदेश दिला तर मात्र ती इमारत पाडून टाकता येत नाही. अशा कचाटय़ात सापडलेल्या तब्बल १३२ इमारती अजून धोकादायक अवस्थेत मुंबईत उभ्या आहेत.
धोकादायक इमारतींबाबत आतापर्यंत मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात आली आहे. कुर्ला येथील इमारतीबाबतही नोटीस देण्यात आली होती. पावसाळय़ाच्या तोंडावर धोकादायक इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये जागरूकता आणण्यासाठी विभाग कार्यालयांच्या मदतीने प्रयत्न केला जाईल, असे उपायुक्त संजोग कबरे यांनी सांगितले.
दृष्टीक्षेपात..
* गेल्या वर्षीपर्यंतच्या एकूण
धोकादायक इमारती ४६२
* इमारती पाडल्या १३६
* दुरुस्त केलेल्या इमारती १८
* अजूनही धोकादायक अवस्थेत उभ्या इमारती ३०८
* रिकाम्या केलेल्या इमारती १२०
* रहिवासी राहत असलेल्या इमारती १८७
* न्यायालयीन प्रकरणात असलेल्या इमारती १३२
* वीज व जलजोडणी खंडित ५०
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/irnFO3b
via IFTTT