मुंबई : मुंबईतील करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी ७०० नव्या रुग्णांची नोंद झाली. रुग्णवाढीचा दर वाढला आणि रुग्णदुपटीचा कालावधी कमी झाला आहे. आठ, दहा दिवसांतच रुग्णसंख्या दुप्पट होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून सर्व संबंधित विभाग, अधिकारी, कर्मचाऱ्यांना सज्ज राहण्याचे आदेश पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत. मुंबईत करोनाच्या चाचण्यांमध्ये वाढ करावी, लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, खासगी रुग्णालयांनी सतर्क राहावे, असे आदेशही आयुक्तांनी दिले आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वेगाने वाढू लागली आहे. आतापर्यंत करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या कमी होती. मात्र आता ही संख्याही वाढू लागली असून रुग्णालयात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढली आहे. दैनंदिन रुग्णांची संख्या मंगळवारी ५०० च्या पुढे गेली होती. त्यामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे. मुंबई महानगरातही करोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला आणि सर्व संबंधित विभाग व खात्यांना दक्ष राहण्याचे निर्देश इक्बाल सिंह चहल यांनी दिले आहेत.
करोना संसर्गाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर प्रशासनाने लसीकरणावर भर दिला होता. १०० टक्के लसीकरणाचा पल्ला गाठल्यामुळे तिसऱ्या लाटेचा प्रभाव अतिशय सौम्य स्तरावरच रोखण्यात प्रशासनाला यश आले. मात्र आता जगातील विविध देशांमध्ये करोनाचे नवीन उपप्रकार आढळले असून संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई महानगरातही मे महिन्यापासून करोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. तसेच पावसाळा सुरू होण्याच्या बेतात असल्याने रुग्णसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर इक्बाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य यंत्रणेला व सर्व संबंधित खाते, विभाग यांना दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत.
जम्बो करोना केंद्रांमध्ये १५ हजार खाटा
करोनाच्या पहिल्या दोन लाटांमध्ये रुग्णालयांत दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी होती. त्यामुळे १० जम्बो करोना केंद्रे सुरू करण्यात आली होती. तिसरी लाट आटोक्यात आल्यानंतर दहिसर, नेस्को गोरेगाव आणि कांजूरमार्ग जम्बो करोना केंद्रे बंद करण्यात आली. तर बीकेसी, शीव, आरसी भायखळा, आरसी मुलुंड आणि वरळी करोना केंद्र कोणत्याही क्षणी सुरू करता येतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. या १० जम्बो करोना केंद्रांमध्ये एकूण १५ हजार खाटांची व्यवस्था आहे.
आयुक्तांचे निर्देश
- युद्धपातळीवर करोना चाचण्या वाढवाव्यात. त्यासाठी सर्व वैद्यकीय प्रयोगशाळा मनुष्यबळासह सुसज्ज असाव्यात.
- १२ ते १८ वर्षे वयोगटातील पात्र मुला-मुलींच्या लसीकरणास वेग द्यावा. प्रतिबंधात्मक मात्रा घेण्यास पात्र नागरिकांना लस घेण्यास प्रवृत्त करावे.
- करोना उपचार केंद्र समर्पित रुग्णालयांनी सतर्क राहावे, तेथे पुरेसे मनुष्यबळ तैनात असेल याची काळजी घ्यावी.
- सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षात (वॉर्ड वॉर रूम) पुरेसे वैद्यकीय आणि इतर कर्मचारी, रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, या दृष्टीने आढावा घ्यावा.
- रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली तर त्यांना प्राधान्याने मालाड येथील करोना रुग्णालयात दाखल करावे.
- पावसाळा तोंडावर असल्यामुळे जम्बो करोना केंद्रांची संरचनात्मक स्थिरता, पर्जन्य जल उदंचन यंत्रणा, अग्निशमन उपाययोजना, वैद्यकीय आणि निमवैद्यकीय कर्मचारी, औषधसाठा आणि वैद्यकीय सामग्री, वैद्यकीय प्राणवायू यंत्रणा, आहार, स्वच्छता इत्यादींशी निगडित सर्व बाबी सुस्थितीत कार्यान्वित असल्याची खातरजमा करावी.
उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत चौपट वाढ
मुंबईत मे महिन्यात उपचाराधीन रुग्णांमध्ये तब्बल चारपटीने वाढ झाली आहे. १ मे रोजी मुंबईत केवळ ६२८ उपचाराधीन रुग्ण होते. ३१ मे रोजी ही संख्या २५२६ पर्यंत पोहोचली आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/PyWE06O
via IFTTT