Type Here to Get Search Results !

“बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल”; राष्ट्रवादी काँग्रेसचा मोदी सरकारवर हल्लाबोल

राष्ट्रवादी काँग्रेसने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अहवालाचा हवाला देत मोदी सरकारच्या नोटबंदी धोरणावर सडकून टीका केलीय. तसेच मागील वर्षीच्या तुलनेत ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये दीडपट वाढ झाल्याचं म्हणत नोटबंदी सपशेल अपयशी ठरल्याचा घणाघाती आरोप केला. रिझर्व्ह बँकेच्या या अहवालाने मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचंही राष्ट्रवादीने म्हटलं. राष्ट्रवादीने याबाबत एक फेसबूक पोस्ट करत मोदी सरकारवर टीका केली.

राष्ट्रवादी काँग्रेसने फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं, “बनावट नोटा पुन्हा वाढल्या, नोटबंदी सपशेल फेल! गतसालाच्या तुलनेत ५०० रुपयांच्या दुप्पट तर २००० रुपयांच्या दीडपट बनावट नोटा सापडल्या. ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ मार्फत शुक्रवारी (२७ मे २०२२) प्रकाशित करण्यात आलेल्या अहवालानुसार आपल्या देशात बनावट नोटांचे प्रमाण वाढले आहे. ज्यामध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १०१.९ टक्क्याने वाढले आहे. २००० रुपयांच्या बनावट नोटांचे प्रमाण ५४.१६ टक्के इतके वाढले आहे.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री ८ वाजता देशासमोर येऊन मोठ्या अभिमानाने देशात नोटबंदी करत असल्याची घोषणा केली. देशातून भ्रष्टाचार दूर व्हावा आणि जनतेला सोसावी लागणारी महागाई कमी व्हावी, हे त्या मागचं मूळ असल्याचेही त्यांनी सांगितलं होतं. मात्र तसं झालं का? हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे,” असं राष्ट्रवादीने म्हटलं.

हेही वाचा : प्रकाश राज यांनी लगावला टोला; नोटबंदी, करोना, जीएसटीची आठवण करून देत म्हणाले…

“एकीकडे जीवनावश्यक वस्तूंचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रकाशित केलेला हा अहवाल मोदी सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करण्यासाठी पुरेसा आहे,” असंही राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पोस्टमध्ये नमूद केलं. तसेच रिझर्व्ह बँकेच्या त्या अहवालाची लिंकही पोस्टमध्ये दिली.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/21c4MNs
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.