Type Here to Get Search Results !

‘जेथे बांग तेथे आजपासून हनुमान चालीसा’

मुंबई : जिथे जिथे भोंग्यावरून बांग दिली जाते तिथे तिथे भोंग्यावरून हनुमान चालीसाचे पठण करावे, असे आवाहन करीत मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भोंग्यांचा त्रास काय होतो हे त्यांनाही समजू दे. देशभरात प्रत्येक राज्यात आपापल्या सत्ताधाऱ्यांना हिंदुची ताकद दाखवून द्या, असा आदेश कार्यकर्त्यांना दिला. राज ठाकरे यांनी बुधवारपासून भोंग्यांविरोधात आंदोलन सुरू करण्याचे आवाहन करणारे पत्र प्रसारित केले.

मशिदीवरील सर्व भोंगे अनधिकृत आहेत. सरकार अनधिकृत मशिदींवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या कशा देते. त्यांना परवानगी देणार असाल तर देवळांनाही परवानगी द्यायलाच हवी. रस्त्यावर नमाजसाठी बसणे, वाहतूक कोंडी करणे कोणत्या धर्मात बसते. भोंग्यांचाही विषय हा प्रश्न धार्मिक नसून सामाजिक आहे. पण या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानेच दिले जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे.

देशातील शांतता बिघडवायची नाही. देशात आम्हाला दंगलीही नकोत. आपण धर्मासाठी हट्टीपणा सोडणार नसाल तर आम्हीही आमचा हट्ट सोडणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात येऊन द्यावीत. मशिदीत बांग सुरू झाल्यावर पोलिसांच्या १०० क्रमांकावर भोंग्याचा त्रास होत असल्याची तक्रार करावी. ती रोज करावी, असा कार्यक्रमही राज ठाकरे यांनी जाहीर केला. तसेच ज्या मशिदींवरील भोंगे उतरवले आहेत त्याचे स्वागत करत त्या मशिदीच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही याची हिंदुंनी काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

हा विषय एका दिवसात सुटणार नाही. प्रत्येक राज्यातील हिंदुंनी आपापल्या सत्ताधारी-राज्यकर्त्यांना हिंदुंची ताकद काय आहे हे दाखवून द्यावे. देशाच्या कारागृहात तमाम हिंदुंना डांबणे सरकारला शक्य होणार नाही हे लक्षात घ्यावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब की पवारांचे ऐकणार?

हिंदुहृदयसम्राट व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंगे बंद झालेच पाहिजे अशी भूमिका जाहीर केली होती. ते तुम्ही ऐकणार आहात की नाही. की सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार यांचे ऐकणार आहात, याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर होऊन जाऊ दे, असे आव्हान राज यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/CARFxuP
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.