मुंबई : बदलीसह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील परिचारिकांनी गुरुवारपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले असून जे. जे. रुग्णालयातील सर्व परिचारिका या संपामध्ये सहभागी झाल्यामुळे आरोग्य सेवेवर परिणाम झाला आहे. या संपामुळे परिचारिका उपस्थित नसल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलाव्या लागल्या आहेत.
विनंती आधारित बदली, रखडलेली पदोन्नती, पदभरती इत्यादी मागण्यांसाठी परिचारिकांचे आझाद मैदान येथे सोमवारपासून बुधवापर्यंत आंदोलन सुरू होते. सरकारने या आंदोलनाची दखल न घेतल्याने अखेर संतप्त झालेल्या परिचारिकांनी गुरुवारपासून राज्यव्यापी ‘काम बंद’ आंदोलन सुरू केले. मुंबईतील शासकीय रुग्णालयातील सुमारे एक हजार परिचारिका या संपात सहभागी झाल्या आहेत. जे. जे. रुग्णालयातील सर्वच म्हणजे सुमारे ६०० परिचारिकांसह राज्य कामगार विमा, सेंट जॉर्ज, जीटी या रुग्णांलयांमधील परिचारिकाही संपात सहभागी झाल्या आहेत.
रुग्णालयातील सर्व परिचारिका संपावर गेल्यामुळे नियमित शस्त्रक्रिया दोन दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जे. जे. रुग्णालयात प्रसूती आणि सिझेरियन वगळून छोटय़ा आणि मोठय़ा अशा जवळपास १०० शस्त्रक्रिया होतात. सध्या या शस्त्रक्रिया स्थगित केल्या असून आपत्कालीन शस्त्रक्रिया मात्र सुरू आहेत, अशी माहिती जे. जे. रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी दिली. आंतररुग्ण विभागात रुग्णांची काळजी घेण्यासाठी परिचारिकाच उपलब्ध नसल्याने या विभागातील आरोग्य सेवा कोलमडली आहे.
रुग्णालयातील परिचारिका अभ्यासक्रम आणि एम.एस्सी नर्सिगच्या विद्यार्थिनींची सध्या मदत घेतली जात आहे. तसेच आंतररुग्ण विभागात नेहमीपेक्षा जास्त निवासी डॉक्टरांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून परिचारिका नसल्याने त्यांची कामे अडून राहणार नाहीत. आपत्कालीन विभागामध्ये मात्र १० ते १५ परिचारिका सेवा देत आहेत. त्यामुळे सर्व नियमित सेवा बंद असल्या तरी आपत्कालीन सुविधा मात्र सुरू असल्याचे डॉ. सापळे यांनी सांगितले.
बैठक निष्फळ, संघटना ठाम
परिचारिकांच्या शिष्टमंडळाशी वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त विरेंद्र सिंह यांची गुरुवारी बैठक झाली. परंतु बैठकीमध्ये काहीही तोडगा न निघाल्याने हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय परिचारिकांच्या संघटनांनी घेतला आहे. वैद्यकीय शिक्षणमंत्री किंवा मंत्रालयातील संबंधित अधिकारी चर्चेला बोलावणार नाहीत तोपर्यंत हे राज्यव्यापी काम बंद आंदोलन बेमुदत सुरू राहणार असल्याची भूमिकाही संघटनेने जाहीर केली आहे.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/t7aOIZd
via IFTTT