Type Here to Get Search Results !

ओबीसी आरक्षणासाठी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा, कारण… : नाना पटोले

“आरक्षण संपवणे हेच भाजपा व त्यांची मातृसंस्था आरएसएसचा अजेंडा असून मंत्रालयावरील भाजपाचा मोर्चा म्हणजे केवळ ‘नौटंकी’ आहे. ओबीसींना आरक्षण मिळावे असे भाजपा नेत्यांना वाटत असेल तर त्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा,” असा घणाघाती हल्ला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. “ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालायावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे. त्यामुळे भाजपाला ओबीसींच्या आरक्षणावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही,” असंही मत यावेळी नाना पटोलेंनी व्यक्त केलं.

नाना पटोले म्हणाले, “मोर्चावेळी भाजपा नेत्यांनी केलेली विधाने ही अत्यंत हास्यास्पद व बालिश होती. सत्तेच्या लालसेने पछाडलेल्या चंद्रकांत पाटील यांनी लोकांना ‘मसनात’ पाठवण्याची भाषा केली ही मग्रुरी असून भाजपाचे लोकच अशी भाषा वापरू शकतात. ओबीसी आरक्षण संपुष्टात येण्याची सुरुवात झाली तीच मुळी २०१७ साली. नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका फडणवीस सरकारने एक साधे परिपत्रक काढून पुढे ढकलल्या आणि प्रकरण चिघळले.”

“पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या आणि आता…”

“यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. त्यादरम्यान ओबीसी आरक्षण वाचावे म्हणून फडणवीस सरकारने कोणतीही हालचाल केली नाही. पाच वर्षे फडणवीस सरकारने झोपा काढल्या आणि आता मात्र ओबीसी आरक्षणाचे खापर महाविकास आघाडीवर फोडू पहात आहेत,” असंही नाना पटोले यांनी सांगितलं.

“जातीनिहाय जनगणना झाली, तर असे वाद निर्माणच होणार नाहीत”

नाना पटोले पुढे म्हणाले, “ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत हीच काँग्रेस पक्षाची भूमिका आहे आणि त्यासाठी महाविकास आघाडी सरकारही प्रयत्नशील आहे. विधानसभेचा अध्यक्ष असताना मी स्वत: जातीनिहाय जनगणना करावी असा ठराव मांडून तो संमत करून घेतला. जातीनिहाय जनगणना झाली, तर असे वाद निर्माणच होणार नाहीत. परंतु, केंद्रातील भाजपा सरकार त्यावर निर्णय घेत नाही.”

हेही वाचा : “ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांच्या चुका, पण…”, नाना पटोलेंचा गंभीर आरोप

“ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपाच”

“ओबीसी आरक्षणाच्या आजच्या परिस्थितीस भाजपाच जबाबदार आहे. धनगर समाजाला पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत आरक्षण देण्याचे आश्वासन देणारा व नंतर पाच वर्ष त्यांना झुलवत ठेवणारा पक्षही भाजपाच आहे. ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावे ही भाजपा सोडता सर्व राजकीय पक्षांची भूमिका आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा खरा मारेकरी भाजपाच आहे. आता भाजपा आंदोलन करत ‘मगरीचे अश्रू’ ढाळत आहे,” अशी टीका नाना पटोले यांनी केली.



from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/wVhRTdp
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.