मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत व राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या मोबाइलचे बेकायदा अभिवेक्षण करताना विशेष शाखेतील पोलिसांना काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यात संजय राऊत कोणाचा साहेब म्हणून उल्लेख करत असतील, तर त्याची माहिती आवर्जून घ्या, अशी सूचना देण्यात आल्याचे संभाषण ऐकणाऱ्या एका पोलिसाने त्याच्या जबाबात कुलाबा पोलिसांना ही माहिती दिली आहे.
राऊत यांच्या एका मोबाइलचे दोन वेळा बेकायदा अभिवेक्षण करण्यात आले होते. ७ नोव्हेंबर, २०१९ ते १४ नोव्हेंबर, २०१९ व १८ नोव्हेंबर, २०१९ ते २४ नोव्हेंबर, २०१९ या दोन कालावधीत राऊत यांचा मोबाइल अभिवेक्षणासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाकडून ठेवण्यात आला होता. त्यांचे संभाषण ऐकणाऱ्या पोलिसाने जबाबात सांगितले की, २०१९ या वर्षांच्या शेवटी संजय राऊत यांच्या मोबाइल क्रमांकाचे काही दिवसांसाठी अभिवेक्षण करण्यात आले होते. त्यांचे दूरध्वनी मी स्वत: ऐकले आहेत. त्यांचा आवाजसुद्धा माझ्या ओळखीचा झाला होता. त्यांचे बहुतेक दूरध्वनी हे राजकीय लोकांच्या भेटी घेण्याबाबत, बैठका आयोजित करण्याबाबत, सहयाद्री गेस्ट हाऊसवर जात असल्याबाबत, मातोश्रीवर बैठकीसाठी जात असल्याबाबत होते. हे दूरध्वनी आम्ही ऐकल्यानंतर त्याबाबत माहिती महत्त्वाची वाटल्यास माझ्या वरिष्ठांना (साहाय्यक पोलीस आयुक्त व मुख्य गुप्तवार्ता अधिकारी) सांगत होतो. राऊत एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी बोलत असल्याचे निदर्शनास आल्यास त्याबाबत माहिती घेण्यास व लक्ष देण्यास सांगण्यात आले होते. ते(राऊत) कोणाला ह्ण साहेबह्णह्ण म्हणत असतील व त्यांच्याशी बोलत असतील तर त्याबाबत माहिती घेण्यास सांगण्यास आले होते, असे या पोलिसाने त्याच्या जबाबात सांगितले आहे. तसेच आमचे वरिष्ठ अधिकारी हे त्यांना ती माहिती महत्त्वाची वाटल्यास त्याबाबत अहवाल तयार करण्यास सांगत त्याप्रमाणे अहवाल करून आम्ही त्यांच्याकडे सुपूर्द करायचो, ते पुढे हा अहवाल शुक्ला मॅडम यांच्याकडे देत होते, असे या पोलिसाने जबाबात म्हटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्याही दोन मोबाइल क्रमांकांचे बेकायदा अभिवेक्षण करण्यात आले होते.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/06Y57kD
via IFTTT