मुंबई : मराठी माणूस म्हटले की संघर्ष आलाच. मुंबईही आपल्याला संघर्ष करूनच मिळाली हे विसरता येणार नाही. दुकानांवर मराठी पाटय़ांच्या निर्णयाला विरोध होतो. मुंबईवरचा मराठी ठसा पुसण्याचा प्रयत्न केल्यास योग्य तो धडा शिकवू. कोणीही यावे आणि उरावर नाचावे हे चालणार नाही, असा सूचक इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी विरोधकांना दिला.
मरिन ड्राइव्ह येथील चर्नी रोड स्थानकाजवळ मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषामंत्री सुभाष देसाई, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मराठी भाषा विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार अरिवद सावंत, खासदार राहुल शेवाळे, भाजपचे आमदार आशीष शेलार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या वर्षी होणार असून त्यांच्या तोंडावर मुंबईतील मराठी अस्मितेचे प्रतीक ठरणाऱ्या मराठी भाषा भवनचे भूमिपूजन करताना महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या या दोन सर्वोच्च नेत्यांनी मराठीच्या स्वाभिमानाचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. मराठी पाटय़ांच्या निर्णयाविरोधात लोक न्यायालयात गेले. महाराष्ट्रात राहायचे आणि मराठीला विरोध करायचा हा नैतिक द्रोह असल्याचे खडे बोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुनावले. पोट भरण्यासाठी मुंबईत येता आणि आल्यावर मराठीलाच विरोध करता? असा सवालही त्यांनी केला. त्यानंतर हाच धागा पकडत दुकानांवर मराठी पाटय़ांच्या निर्णयाला विरोध होतो. ही वेळ का आली, याचा विचार केला पाहिजे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. इतर भाषांचा द्वेष मराठीने कधीही केला नाही. पण म्हणून त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकातील मराठी भाषिक अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत, सहन करणार नाही, असेही ठाकरे यांनी ठणकावले.
हे केवळ मराठी भाषा भवन नसून ते आपल्या मातृभाषेचे मंदिर आहे. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आपल्या मातृभाषेच्या मंदिराचे भूमिपूजन करत आहोत. जबाबदाऱ्या पार पाडताना आपल्या हातून होणारी काही कामे आयुष्याचे सार्थक झाल्याचा आनंद देणारी असतात. मुंबई महाराष्ट्रात यावी यासाठी माझे आजोबा लढले. मुंबई मिळाल्यानंतर या शहरात मराठी माणसाचा आवाज बुलंद करण्याचे काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केले. त्याच मुंबईत मराठी भाषा भवनचे भूमिपूजन मुख्यमंत्री या नात्याने माझ्या हस्ते झाले. ही माझ्या जीवनाचे सार्थक झाल्याचा आनंद देणारी घटना आहे, अशी भावना ठाकरे यांनी व्यक्त केली. मराठी माणूस म्हटले की संघर्ष आलाच. भाषेनुसार प्रांतरचना झाली, मात्र महाराष्ट्राला मुंबई ही रक्त सांडून, लढून मिळावावी लागली हा इतिहास आहे. जो इतिहास विसरतो त्याला भविष्य राहात नाही. जास्तीत जास्त भाषा शिकणे गुन्हा नाही, पण आपल्या मातृभाषेचा न्यूनगंड कधीही वाटता कामा नये.
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभाराची भाषा स्वभाषाच हवी हे ठणकावून सांगितले होते. एवढेच नाही तर राज्य व्यवहार कोश तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली. त्यामुळे रोजच्या वापरातील प्रशासकीय मराठी भाषाही सोपी असावी, असा आग्रह मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्यक्त केला. व्यपगत, नस्ती यासारखे सरकारी शब्द कळायला कठीण आहेत. त्याला पर्यायी शब्द देण्यासाठी कोश तयार करण्याचे काम मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी हाती घेतले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. आम्ही मराठीचा आग्रह धरला की आमच्यावर टीका होते. टीका तर माझ्यावर नेहमीच सुरू असते. मी टीकेला किंमत देत नाही. टीका करणाऱ्यांची किंमत मला माहिती आहे, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
गगराणी यांच्याकडून प्रेरणा घ्या
मराठी भाषा भवनचे भूमिपूजन होत असताना मराठी भाषा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी भूषण गगराणी आहेत. मराठी विषय घेऊन आयएएस झालेले ते अधिकारी आहेत याचा औचित्यपूर्ण उल्लेख उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच मराठी तरुण-तरुणींनी भाषेचा न्यूनगंड न बाळगता गगराणी यांच्याकडून प्रेरणा घेऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन पवार यांनी केले.
मराठीला विरोध हा नैतिक द्रोह : अजित पवार
महाराष्ट्रात राहायचे आणि मराठीला विरोध करायचा हा नैतिक द्रोह आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. पोट भरण्यासाठी मुंबईत येता आणि आल्यावर मराठीलाच विरोध करता? असा प्रश्नही त्यांनी केला. मराठीच्या मुद्दय़ावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केले.
इतर भाषांचा द्वेष मराठीने कधीही केला नाही. पण म्हणून त्यांचे आक्रमणही नको. कर्नाटकातील मराठी भाषकांवरील अत्याचार खपवून घेतले जाणार नाहीत.
– उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/al3m7Ns
via IFTTT