मुंबई : अंधेरी (पश्चिम) येथील वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर गुरुवारी संध्याकाळी वाहून आलेल्या गोणीमध्ये १९ वर्षीय तरुणीचा मृतदेह सापडला. या तरुणीचा गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय असून त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पोत्यात भरून समुद्रात फेकण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तरुणीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर या तरुणीवर लैंगिक अत्याचार झाला होता का, हे स्पष्ट होईल. वर्सोवा येथील जे. पी. मार्गावरील बरिस्ता लेनजवळ गुरुवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास तरुणीचा मृतदेह आढळला. याबाबत माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.
या तरुणीचे हात-पाय इंटरनेटच्या वायरने बांधलेले होते. तीच वायर तिच्या गळय़ात अडकवण्यात आली होती. वायरने तिचा गळा दाबण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने काही दिवसांपूर्वी तिची हत्या झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ती किशोरवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत तरुणी गोरेगाव येथील चाळीत आई-वडील व भावंडांसोबत राहात होती.
ती २६ एप्रिलला बेपत्ता झाली होती. त्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी गोरेगाव पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत दिलेल्या वर्णनाच्या आधारे वर्सोवा पोलिसांनी तिची ओळख पटवण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना बोलावले. पोलिसांनी शुक्रवारी पहाटे अनोळखी व्यक्तीविरोधात भादंवि कलम ३०२ आणि २०१ अंतर्गत हत्या आणि पुरावे नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/N5VOpzj
via IFTTT