मुंबई : राज्यात १२ ते १४ वयोगटाचे लसीकरण सुरू होऊन जवळपास १५ दिवस उलटून गेले तरी या लसीकरणाला फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. राज्यभरात ३० टक्के बालकांचे लसीकरण झाले असून सर्वात कमी म्हणजे अवघे ७ टक्के लसीकरण मुंबईत झाले आहे.
करोनाची तिसरी लाट ओसरल्यामुळे लसीकरणाचा एकूणच जोर गेल्या महिनाभरापासून कमी झाला आहे. जानेवारीत राज्यात सुमारे ४ लाख ६९ जणांचे लसीकरण झाले होते. फेब्रुवारीमध्ये यात जवळपास निम्म्याने घट झाली असून सुमारे २ लाख ६८ हजार जणांनी लस घेतली. मार्चमध्ये तर यात आणखीनच घट झाली असून राज्यात केवळ १ लाख ७२ हजार ३८७ जणांचे लसीकरण झाले आहे.
१२ ते १४ वयोगटाचे लसीकरण १६ मार्चपासून सुरू झाले. या वयोगटासाठी लसीकरण खुले झाल्यानंतर लसीकरणाला चांगला प्रतिसाद मिळणे अपेक्षित होते, परंतु करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे या वयोगटाचे लसीकरण करून घेण्यास पालकांनी पाठ फिरवली आहे. राज्यभरात सुमारे ३० टक्के बालकांचे लसीकरण झाले आहे. लवकरच या बालकांचे दुसऱ्या मात्रेचे लसीकरणही आता १६ एप्रिलपासून सुरू होईल, परंतु त्या तुलनेत प्रतिसाद मिळत नसल्यामुळे काय करावे असा प्रश्न जिल्ह्यांसमोर उभा राहिला आहे.
सांगलीमध्ये सर्वाधिक
राज्यभरात सर्वाधिक सुमारे ७० टक्के लसीकरण सांगली जिल्ह्यात झाले आहे. त्याखालोखाल सिंधुदुर्ग, भंडारा, सातारा, नगर, कोल्हापूर, बीड, गोंदिया आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक बालकांचे लसीकरण झाले आहे.
एकूण लसीकरणामध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या मुंबईत मात्र बालकांच्या लसीकरणाला मिळणारा प्रतिसाद अत्यल्प आहे. सर्वात कमी सात टक्के बालकांचे लसीकरण मुंबईत झाले आहे. अकोला, परभणी, बुलढाणा, नंदुरबार, नागपूर, नांदेड, जालना, औरंगाबाद येथे २० टक्क्यांपेक्षाही कमी लसीकरण झाले आहे. ठाण्यामध्ये २० टक्के बालकांनी लस घेतली आहे.
मात्रा वाया जाण्याचे प्रमाण अधिक
या वयोगटाला दिल्या जाणाऱ्या कोर्बेव्हॅक्स लशीच्या एका कुपीमध्ये २० मात्रा आहेत. लसीकरणाला प्रतिसाद कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये लस मात्रा वाया जाण्याचे प्रमाण अधिक आहे. अन्य जिल्ह्यांमध्ये प्रमाण वाढले असल्यामुळे तेथे मात्रा वाया जाण्याचे प्रमाण आता कमी झाले आहे, अशी माहिती आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.
from Mumbai Marathi News, Mumbai Latest Marathi News, Mumbai News Headlines & Updates | मुंबई मराठी ताज्या बातम्या at Loksatta.com | Loksatta https://ift.tt/8DcvwQb
via IFTTT