Type Here to Get Search Results !

आठवडय़ाची मुलाखत : ताणमुक्त होऊन परीक्षा द्या!

अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ : शरद गोसावी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (राज्य मंडळ) घेण्यात येणारी बारावीची परीक्षा शुक्रवारपासून सुरू होणार आहे. तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून सुरू होणार आहे. परीक्षा घेण्यावरून झालेल्या अनेक नाटय़पूर्ण घडामोडींनंतर अखेरीस शिरस्त्यानुसार प्रत्यक्ष परीक्षा होणार आहे. त्या अनुषंगाने परीक्षेच्या नियोजनाबाबत राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांच्याशी साधलेला संवाद.

 ’ करोनाच्या साथीच्या काळात शिक्षण ऑनलाइन, प्रत्यक्ष अशा गर्तेत अडकले असताना आता परीक्षा होणार आहेत. त्याचे नियोजन कसे करण्यात आले आहे?

विद्यार्थ्यांनी ताण न घेता, आत्मविश्वासाने परीक्षा द्यावी. परीक्षेचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या ओळखीच्या वातावरणात, शाळेतच परीक्षा देता येणार आहे. त्यासाठी यंदा प्रत्येक शाळेत परीक्षा केंद्र किंवा उपकेंद्र असेल. दहावी आणि बारावी मिळून जवळपास ३१ हजार केंद्रांवर परीक्षा होणार आहे. प्रत्येक केंद्रावर आवश्यक पायाभूत सुविधा, स्वच्छता, मनुष्यबळ उपलब्ध करण्यात येईल असे हमीपत्र शाळांकडून घेण्यात आले आहे. एखादा विद्यार्थी आजारी असल्यास त्याला वेगळे बसवण्याची व्यवस्थाही केंद्रांनी करणे अपेक्षित आहे. प्रत्येक केंद्राला सॅनिटायजर पुरवण्यात येणार आहे.

’ विद्यार्थ्यांनी परीक्षेपूर्वी एक तास केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक आहे का?

विद्यार्थ्यांची लेखनाची सवय काहीशी कमी झाली आहे. याचा विचार करून पंधरा ते तीस मिनिटांचा वेळ वाढवून देण्यात येणार आहे. त्यामुळे दरवर्षी ११ वाजता सकाळच्या सत्रातील परीक्षा सुरू होत असे ती आता १०.३० ला सुरू करण्यात येईल. त्यापूर्वी १० मिनिटे आधी विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यात येतील. त्यानुसार साधारण १० वाजता विद्यार्थ्यांनी परीक्षा कक्षात उपस्थित असणे आवश्यक आहे. परीक्षेपूर्वी प्रत्येक विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केंद्रावर तासभर आधी उपस्थित राहिल्यास सोयीचे होईल.

’ यंदा केंद्रांची संख्या वाढली आहे. त्यानुसार गैरप्रकार टाळण्यासाठी काय उपाय योजण्यात आले आहेत?

यंदा परीक्षेचे नियोजन आव्हानात्मक आहे याची मंडळालाही कल्पना आहे. स्थानिक प्रशासन, महसूल विभागातील कर्मचारी यांचीही मदत घेण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर एक बैठे पथक असेल तसेच भरारी पथकांच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत.

’ एसटीच्या संपामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवासाचा प्रश्न आहे. त्यावर काय मार्ग काढण्यात आला आहे?

विद्यार्थ्यांना प्रवासासाठी सहकार्य करण्याची विनंती आम्ही एसटी महामंडळाला केली आहे. प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांसाठी विद्यार्थी  एकत्रितपणे वाहनाची सोय करून आले होते. परंतु आता प्रत्यक्ष परीक्षेसाठी बारावीच्या विद्यार्थ्यांना ६ दिवस  तर दहावीच्या विद्यार्थ्यांना ९ दिवस केंद्रावर यावे लागेल. विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्यास त्या वेळेनुसार सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल. राज्य मंडळ आणि विभागीय मंडळाच्या मदतवाहिन्या कार्यरत आहेत.

’ फेरपरीक्षेचे नियोजन कसे आहे? 

आताच्या परीक्षेचा निकाल जूनमध्ये जाहीर करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येत आहे. त्यानंतर जुलैअखेर, ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा घेण्यात येईल. त्याचा निकाल परीक्षेनंतर पुढील पंधरा दिवसांत जाहीर करण्याचा प्रयत्न आहे.

’ राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार पुढील वर्षी परीक्षेत काही बदल होणार आहेत का? केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने सत्रपरीक्षा सुरू केली, तसे काही नियोजन आहे का?

शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीचा आराखडा शासनाच्या स्तरावर तयार होणार आहे. त्यानुसार पुढील वर्षांचे नियोजन असेल. राष्ट्रीय धोरणात कुठेही परीक्षा रद्द कराव्यात असे म्हटलेले नाही. त्याचे स्तोम कमी व्हावे असे म्हटले आहे. त्यासाठी राज्याच्या स्तरावर कसे, काय बदल करावे लागतील याबाबत शिक्षण विभागाचे काम सुरू आहे.

The post आठवडय़ाची मुलाखत : ताणमुक्त होऊन परीक्षा द्या! appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/yXxcvqN
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.