मास्टर लिस्ट प्रक्रिया पुन्हा सुरू
मुंबई : दक्षिण मुंबईमधील कोसळलेल्या वा अतिधोकादायक झालेल्या इमारतींमधील रहिवाशांना सुविधांचा अभाव असलेल्या म्हाडाच्या संक्रमण शिबिरात अनेक वर्षे खितपत पडावे लागले असून या रहिवाशांना कायमस्वरूपी हक्काचे घर देण्यासाठी म्हाडा प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाने पुन्हा एकदा मास्टर लिस्ट योजनेची प्रक्रिया सुरू केली आहे. यासाठी मूळ रहिवाशांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली असून रहिवाशांना ४ मार्चपासून ४ एप्रिलपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
इमारत कोसळल्यानंतर बेघर होणाऱ्या, तसेच अतिधोकादायक इमारतींमधील रहिवाशांना दुरुस्ती मंडळाच्या संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्यात येते. मूळ इमारतीचा पुनर्विकास झाल्यानंतर या रिहवाशांना हक्काचे घर देण्यात येते. तोपर्यंत या रहिवाशांना संक्रमण शिबिराच्या आश्रयालाच राहावे लागते. अनेक इमारती कोसळून २५ ते ३० वर्षे लोटल्यानंतर विविध कारणांमुळे त्यांचा पुनर्विकास होऊ शकलेला नाही. प्रत्यक्षात मात्र एकदा संक्रमण शिबिरात आल्यानंतर पुन्हा हक्काच्या घरात जाताच येत नसल्याचे चित्र मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे गेली अनेक वर्षे हजारो कुटुंबांना संक्रमण शिबिरातील घरात राहावे लागत आहे.
गेली अनेक वर्षे संक्रमण शिबिरात खितपत पडलेल्या रहिवाशांना हक्काचे कायमस्वरूपी घरे मिळावे यासाठी म्हाडाने मास्टर लिस्ट योजना हाती घेतली होती. मंडळाला उपकरप्राप्त इमारतीच्या पुनर्विकासाअंतर्गत खासगी विकासकाकडून मिळणारी घरे या रहिवाशांना मास्टर लिस्ट योजनेनुसार सोडत पद्धतीने देण्याचा मानस होता. म्हाडाने या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेकडो रहिवाशांना घरे दिली आहेत. मात्र या मास्टरलिस्ट प्रक्रियेत गोंधळ आणि भ्रष्टाचार असल्याचा सातत्याने आरोप होत असून या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाइन अर्जनोंदणी पद्धतीने सुरू करण्यात आली. मात्र त्यानंतरही मास्टरलिस्ट प्रक्रिया वादात अडकली. त्यामुळेच ऑनलाइन अर्जनोंदणी ही सलग सुरू नसते.
मागील काही महिन्यांपासून बंद असलेली ऑनलाइन अर्ज नोंदणी अखेर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. यासंबंधीची जाहिरात मंडळाने नुकतीच प्रसिद्ध केली. या जाहिरातीनुसार ४ मार्च ते ४ एप्रिलपर्यंत रहिवाशांना ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहे. या प्रक्रियेच्या अनुषंगाने मास्टर लिस्टमधील घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. अर्ज नोंदणी कायमस्वरूपी सुरू ठेवावी.
The post संक्रमण शिबिरातील रहिवाशांना हक्काचे घर; मास्टर लिस्ट प्रक्रिया पुन्हा सुरू appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/zdjHmbl
via IFTTT