वातानुकूलित लोकलच्या वेळापत्रक बदलामुळे सामान्य लोकलचे तीनतेरा
मुंबई : अधिक भाडेदरामुळे प्रवाशांकडून अल्प प्रतिसाद मिळत असतानाही वातानुकूलित लोकलसाठी १९ फेब्रुवारीपासून सामान्य (विनावातानुकूलित) लोकलच्या वेळापत्रकात अनेक बदल करण्यात आले आहेत. हे फेरबदल करताना जलद आणि अर्धजलद लोकल सेवांवर भर देण्यात आला आहे. याची पुसटशीही कल्पना नसल्याने प्रवासी नियोजित वेळेत सामान्य लोकल पकडण्यासाठी स्थानकात येत असून आपली नेहमीची लोकल नसल्याचे पाहून प्रवाशांचा गोंधळ उडत आहे.
एकही सामान्य लोकल फेरी
रद्द न करता किंवा त्यांच्या वेळापत्रकात बदल न करता वातानुकूलित फेऱ्यांची संख्या वाढविल्याचा दावा मध्य रेल्वेकडून करण्यात येत होता. परंतु १९ फेब्रुवारीपासून नवीन लोकल फेऱ्यांमुळे काही विनावातानुकूलित धिम्या आणि जलद लोकल फेऱ्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे हळूहळू प्रवाशांच्या निदर्शनास येऊ लागले आहे. सीएसएमटी स्थानकातून रात्री ९.४२ वाजता सुटणारी विनावातानुकूलित कल्याण अर्ध जलद लोकल घाटकोपरपासून धीमी आहे. या लोकलच्या बदल्यात त्या वेळी वातानुकूलित लोकल चालविण्यात येत आहे. त्यामुळे स्थानकात ही लोकल पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांचा गोंधळ उडाला. परिणामी, त्यानंतरची रात्री ९.५४ वाजता सुटणाऱ्या विनावातानुकूलित कल्याण जलद लोकलवर प्रवाशांना अवलंबून राहावे लागत आहे.
दुपारी ३.१९ वाजताच्या सीएसएमटी ते टिटटवाळा वातानुकूलित लोकलसाठी दुपारी ३.१७ वाजता सुटणारी सीएसएमटी ते कल्याण पंधरा डबा जलद लोकलची वेळ बदलून दुपारी ३.१४ अशी करण्यात आली. सायंकाळी ६.१० वाजता सीएसएमटी ते ठाणे विनावातानुकूलित जलद लोकलऐवजी वातानुकूलित जलद, सीएसएमटी ते ठाणे सकाळी ८.०४ वाजता विनावातानुकूलित जलद लोकलऐवजी वातानुकूलित, सीएसएमटी ते कसारा रात्री १०.५० वाजता अर्ध जलद लोकल ही पूर्ण जलद केली आहे. अशाचप्रकारे सीएसएमटीकडे येणाऱ्या काही लोकलच्या फेऱ्यांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले आहेत. अचानक केलेल्या या बदलांमुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. याची माहितीही नसल्याने प्रवाशांना लोकलमधून उतरून त्वरित दुसरी लोकल पकडण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
४४ फेऱ्यांमध्ये २४ जलद, एक अर्धजलद
रेल्वेने १९ फेब्रुवारीपासून प्रवाशांसाठी सीएसएमटी ते कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळासाठी ३६ नवीन लोकल फेऱ्या सेवेत आणल्या. यात ३४ वातानुकूलित लोकल फेऱ्या आणि दोनच विनावातानुकूलित फेऱ्यांचा समावेश केला. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते कल्याण मार्गावर १० वातानुकूलित फेऱ्या आधीच सुरू होत्या. त्यात ३४ फेऱ्यांची भर पडल्याने त्यांची संख्या ४४ वर पोहोचली. या ४४ फेऱ्यांमध्ये २४ फेऱ्या जलद आणि एक अर्ध जलद लोकलचा समावेश आहे.
The post एसी लोकलमुळे ऐशीतैशी! appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/MiGHjy5
via IFTTT