Type Here to Get Search Results !

मुंबईत सव्वातास वीजपुरवठा खंडित ; पारेषण यंत्रणा, टाटा पॉवरचे वीजसंच बंद झाल्याचा परिणाम

मुंबई : मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण वाहिन्यांपैकी मुलुंड-ट्रॉम्बे या २२० केव्ही वाहिनीत तांत्रिक बिघाड झाल्यानंतर टाटा पॉवरचे ट्रॉम्बे येथील वीजसंच बंद पडल्याने एकूण ९७६ मेगावॉटचे भारनियमन होऊन दक्षिण मुंबईसह चेंबूर व आसपासच्या परिसरात रविवारी सकाळी पावणेदहा ते अकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे लोकलसेवा बंद पडण्यासह जनजीवन विस्कळीत झाल़े

पारेषण वाहिन्यांतील बिघाड व टाटा पॉवरचे वीजसंच बंद पडण्याआधी मुंबईत २०८३ मेगावॉट वीजमागणी होती़ त्यानुसार वीजपुरवठा सुरू होता. पण, या बिघाडामुळे वीजपुरवठा काही मिनिटांत ११०७ मेगावॉटपर्यंत खाली आला आणि ९७६ मेगावॉटचे भारनियमन झाले, असे ऊर्जा विभागाकडून सांगण्यात आले. सकाळी ९.४९ ते ११ याकाळात प्रामुख्याने कर्नाक बंदर भागात ६० मेगावॉट, परळ ६५, महालक्ष्मी १०५, धारावी १७९, बॅकबे ४८, ग्रान्ट रोड ४४, चेंबूर ५०, ट्रॉम्बे ११५, मानखुर्द १६, बीकेसी ४९, वडाळा ०५ व चेंबूरमधील अदानीचा परिसर ६८ मेगावॉट असे भारनियमन करावे लागले. 

मुंबईला वीजपुरवठा करणाऱ्या पारेषण यंत्रणांची अपुरी क्षमता व त्यामुळे शहर अंधारात जाण्याचे प्रकार वर्ष-दोन वर्षांतून एकदा तरी  घडत आहेत. १३ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई व आसपासच्या परिसरात वीजपुरवठा बंद पडला होता आणि तो पूर्ववत होण्यास दोन दिवस लागले होते. त्यानंतर उच्चस्तरीय चौकशी व अहवाल, कृती आराखडा असे सर्व सरकारी सोपस्कार पार पडल्यानंतरही रविवारी पुन्हा पारेषण यंत्रणेतील बिघाड व मुंबईत वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या आणि भार प्रेषण केंद्रातील आपत्कालीन यंत्रणेच्या अकार्यक्षमतेचा फटका मुंबईला पुन्हा बसला. या वीजगोंधळानंतर विविध यंत्रणांनी एकमेकांवर खापर फोडण्याचे प्रयत्न सुरू केले.

सकाळी पावणेदहाच्या सुमारास महापारेषणच्या वाहिनीत बिघाड झाल्याने आमच्या वीजनिर्मिती केंद्रावर ताण येऊन ते बंद पडले.  तांत्रिक बिघाडामुळे वीजनिर्मिती २ हजार मेगावॉटवरून १२०० मेगावॉटपर्यंत खाली आली होती. त्यानंतर आम्ही जलविद्युत प्रकल्पातील वीजपुरवठा वाढवण्यासह विविध उपाययोजना करत वीजपुरवठा पूर्ववत केला. बिघाडाचे नेमके कारण शोधण्यात येत असून भार प्रेषण केंद्राशी समन्वय साधून यापुढे असे पुन्हा होणार नाही याचे प्रयत्न सुरू आहेत, असे टाटा पॉवरच्या पारेषण व वितरण विभागाचे अध्यक्ष संजय बांगा यांनी म्हटले आहे.

‘‘पारेषण वाहिनीतील बिघाड आणि टाटा पॉवरच्या वीजनिर्मिती केंद्रातील संच बंद पडल्याने दक्षिण मुंबईत वीजपुरवठा बंद पडला. आम्ही तातडीने डहाणूतील वीजनिर्मिती वाढवल्याने मुंबई उपनगरातील अदानीच्या ग्राहकांना या बिघाडाचा फारसा त्रास झाला नाही. इतकेच नव्हे तर उपनगरातील आमचा वीजपुरवठा सुरळीत राहिल्याने दक्षिण मुंबईतील बेस्ट व टाटाच्या भागातील वीजपुरवठा सुरळीत करणे सोपे झाले’’, असे अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.ने आपल्या निवेदनात म्हटले आहे. मागील बिघाडानंतर तीन चौकशा व त्यांचे अहवाल, शिफारसी हे सारे होऊनही पुन्हा मुंबईतील वीजपुरवठय़ाचा गोंधळ कायम आहे हे लाजिरवाणे आहे. शंभर वर्षांची कार्यक्षम वीजयंत्रणेची परंपरा आपसांतील समन्वयाअभावी खंडित झाली आहे. आता कठोर कारवाईची गरज आहे, असे वीजतज्ज्ञ अशोक पेंडसे यांनी सांगितले.    

उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

’या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यांवर उचित कारवाई केली जाईल, असे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी सांगितल़े

’दक्षिण मुंबईतील वीजपुरवठा बंद झाल्याचे कळताच ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी, महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी संपर्कात होतो.

’विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटांत दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला, असे राऊत म्हणाल़े

The post मुंबईत सव्वातास वीजपुरवठा खंडित ; पारेषण यंत्रणा, टाटा पॉवरचे वीजसंच बंद झाल्याचा परिणाम appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/sqAzM3j
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.