Type Here to Get Search Results !

मुंबईत विद्युत वाहन कक्ष; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण

मुंबई : मुंबई महानगरात विद्युत वाहनांना अर्थात विद्युत वाहनांच्या वापरास प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई पालिकेच्या पर्यावरण विभागांतर्गत मुंबई विद्युत वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात पर्यटन व राजशिष्टाचारमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या कक्षाचे बुधवारी लोकार्पण करण्यात आले.  हे क्रांतिकारक पाऊल असून या माध्यमातून विद्युत वाहनांचा वापर वाढविण्यासाठी मदत होईल, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला.

वातावरणीय बदलांच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक उपाययोजना करून शाश्वत विकासाकडे राज्य शासनाची वाटचाल सुरू आहे. याच अनुषंगाने राज्याने आपले सुधारित विद्युत वाहन धोरण जाहीर केले आहे. याअंतर्गत विद्युत वाहनांचा वापर वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून या प्रयत्नांचा एक भाग म्हणून मुंबई विद्युत वाहन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

विद्युत वाहनांचा वापर वाढविण्यासाठी सुरुवातीला सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्यात आले. आता शासकीय पातळीवर विद्युत वाहने खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे वैयक्तिक पातळीवर या वाहनांचा वापर वाढावा यासाठी चार्जिग स्थानकांसारख्या सुविधा वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

कक्ष कशासाठी?

मुंबई विद्युत वाहन कक्षाच्या माध्यमातून शासकीय अधिकारी, या क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्युत वाहन उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी यांना एकत्र आणण्यात येणार आहे. विद्युत वाहनांच्या प्रचारासाठी निर्णय घेण्यासाठी धोरणकर्त्यांना साहाय्य करणे, मुंबई महानगरात विद्युत वाहन चार्जिगसाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, विद्युत वाहनांच्या खरेदीसाठी सुलभरीत्या कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, वाहनांमधील बॅटरींसाठी अद्ययावत तंत्रज्ञान अमलात आणणे, बेस्टच्या सहयोगाने विद्युत बसेसचा ताफा तयार करणे, सार्वजनिक वाहतूक आणि मालवाहतूक वाहनांचे विद्युतीकरण करणे, मुंबईत प्रायोगिक तत्त्वावर कामकाज करण्यासाठी विद्युत वाहन क्षेत्रातील नवउद्योजकांना साहाय्य करणे अशी विविध कार्ये या कक्षाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.

२०२७ पूर्वी १०० टक्के विद्युत बसेस

सार्वजनिक वाहतुकीअंतर्गत मुंबईत बेस्टच्या ताफ्यात सध्या असलेल्या ३८६ बसेसमध्ये लवकरच वाढ होऊन २०२७ पूर्वी १०० टक्के बसेस विद्युत असतील यासाठी नियोजन करण्यात येत आहे. वातावरणीय बदलांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांचा उल्लेख करून आदित्य ठाकरे यांनी कार्बन न्यूट्रलच्या दिशेने जाताना संबंधित सर्वच विभागांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सांगितले.

The post मुंबईत विद्युत वाहन कक्ष; पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/q3VoCj9
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.