लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाकडून ‘निर्भया’अंतर्गत निधीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे
मुंबई : प्रवाशांकडून करण्यात येत असलेल्या तक्रारींचा वेळेत निपटारा लागत नसल्याने लोहमार्ग पोलिसांनी १५१२ ही मदतवाहिनी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी ‘निर्भया’अंर्तगत निधी उपलब्ध व्हावा असा एक प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात आल्याची माहिती लोहमार्ग पोलीस आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली. मध्य व पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवासी लोहमार्ग पोलिसांच्या मदतवाहिनीवर विविध तक्रारी करतात. परंतु अपुरे मनुष्यबळ, व्यस्त असलेली मदतवाहिनी, हरवलेली वस्तू शोधण्यासाठी एखाद्या लोकलचा माग घेण्यात आलेले अपयश इत्यादी कारणांमुळे लोहमार्ग पोलिसांनाही तक्रारदारांच्या तक्रारीचा छडा लावण्यात अपयश येत आहे.
रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी लोहमार्ग पोलिसांची १५१२ मदतवाहिनी कार्यरत आहे. प्रवासात एखादी वस्तू हरविणे-विसरणे, याशिवाय लोकलमधील महिला आणि अपंगांच्या राखीव डब्यातील घुसखोरी, विनयभंग, छेडछाड, फेरीवाले, भिकारी, दारू पिऊन प्रवास करणारे इत्यादींविषयी तक्रारींचा भडिमार सतत मदतवाहिनीवर होत असतो. या मदतवाहिनीवर दिवसाला ५०० ते ६०० दूरध्वनी येत असतात. प्रवासी तक्रारींबरोबरच अन्य बाबींबाबत चौकशी आणि माहिती मिळवण्यासाठी मदतवाहिनीवर संपर्क साधतात. यात वस्तू विसरणे, गहाळ झाल्याच्या तक्रारी अधिक असतात. त्याची दखल घेऊन लोहमार्ग पोलिसांची यंत्रणा कामाला लावली जाते आणि ती वस्तू पुन्हा प्रवाशाला परत करण्याचे प्रयत्नही करण्यात येतात. सॅन्डहस्र्ट रोड येथील मुख्यालयातून हेल्पलाइनचे काम करण्यात येते. पाच संगणक, सकाळच्या सत्रात पाच आणि रात्रपाळीला पाच असे कर्मचारी काम करतात. सध्या ही यंत्रणा अद्ययावत नाही. मानवीपद्धतीने ती हाताळताना तक्रारींचा जलदगतीने निपटाराही होत नाही. लोकल प्रवासात एखादी वस्तू हरविल्यास किंवा छेडछाड, घुसखोरी किंवा प्रवाशांमध्ये वादविवाद झाल्याची तक्रार प्राप्त होताच त्याचा नेमका ठावठिकाणा कळावा यासाठी जीपीएससारख्या यंत्रणेची अंमलबजावणी, मदतवाहिनी कक्षात मोठय़ा स्क्रीन, अतिरिक्त संगणक, पुरेसे कर्मचारी उपलब्ध करणे इत्यादी बाबींबरोबरच यंत्रणा अद्ययावत व आधुनिकीकरण करण्याचा मानस आहे.
दोन वर्षांत ७ हजार २२५ तक्रारी
वस्तू विसरणे, गहाळ झाल्याच्या २०२० मध्ये मदतवाहिनीवर ३ हजार ७९६ आणि २०२१ मध्ये ३ हजार ४२९ अशा एकूण ७ हजार २२५ तक्रारी लोहमार्ग पोलिसांना प्राप्त झाल्या. यात प्रवासामध्ये एकूण ४६० तक्रारी मोबाइल हरवल्याच्या आहेत. यामध्ये १०० मोबाइलच संबंधितांना परत करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर सोन्याचे दागिने गहाळ झाल्याच्या ६४१ तक्रारी आल्या असून त्यापैकी फक्त ३३ तक्रारींमध्येच सोने परत करण्यात आले आहे. उर्वरित तक्रारींमध्ये सोने सापडलेले नाही. याशिवाय प्रवासादरम्यान ४२५ टॅब, लॅपटॉप हरविले असून फक्त पाच टॅब आणि १२९ लॅपटॉप प्रवाशांना परत करण्यात आले आहेत.
मदतवाहिनी अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी लोहमार्ग पोलीस ‘निर्भया’अंर्तगत निधी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी काही कोटी रुपये निधी लागणार असून तसा प्रस्तावर केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यंत्रणा अद्ययावत करताना मदतवाहिनीवर अधिकाधिक तक्रारी प्राप्त कशा होतील आणि त्यांचे निवारण जलदगतीने कसे होईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
– कैसर खालिद, आयुक्त, लोहमार्ग पोलीस
The post जलद तक्रार निवारणासाठी रेल्वे पोलिसांची मदतवाहिनी अद्ययावत? appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/0qvgRds
via IFTTT