Type Here to Get Search Results !

एसटीच्या २,२०० चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया रखडली

मुंबई: गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एसटीतील २,२०० चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रिया रखडली आहे. चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांपैकी काहींचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, तर काहींचे चाचणी व प्रशिक्षण बाकी आहे. या भरतीला महामंडळाने करोनाकाळात दिलेली स्थगिती अद्यापही कायम आहे. त्यामुळे संपकाळात या कर्मचाऱ्यांना रुजू करण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी खासगी आणि सेवानिवृत्त चालक घेण्यावरच भर दिला आहे. या पदाच्या उमेदवारांना सेवेत घेण्याचे महामंडळाकडून वारंवार आश्वासन दिले जात असून, अनेकांनी विविध खासगी कंपन्यांमध्ये असलेली नोकरी सोडून एसटीतील या नोकरीसाठी प्रयत्न केले आहेत.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च २०२० पासून संपूर्ण भारतात टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशावेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने त्यावरील स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठवलीही होती.

मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागल्याने चालक कम वाहकांच्या भरती प्रक्रियेला पुन्हा स्थगिती दिली. असे एकूण २,२०० उमेदवार आहेत. एसटीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील ८०० जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, तर १,४०० जणांची चाचणी व प्रशिक्षण बाकी असून त्यांनी कागदपत्रे व अन्य पूर्तता केली आहे. यावरील स्थगिती  उठवण्यात आलेली नाही.

The post एसटीच्या २,२०० चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया रखडली appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/oyWOdFv4x
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.