Type Here to Get Search Results !

आठवडय़ाची मुलाखत : समाजशास्त्राची शतक महोत्सवी वाटचाल..

डॉ. बालाजी केंद्रे, विभागप्रमुख, समाजशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या स्थापनेला शंभराहून अधिक वर्षे  होऊन गेली आहेत. विद्यापीठातील सर्वात जुन्या विभागांपैकी हा एक विभाग. कालौघात समाजशास्त्र या विषयासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद काहीसा घटला असला तरीही या विषयातील संशोधन आणि अभ्यासाची गरज संपलेली नाही. विद्यापीठाची वाटचाल आणि समाजशास्त्र विभागातील अभ्यासक्रम यांचा वेध घेण्यासाठी या विभागाचे प्रमुख डॉ. बालाजी केंद्रे यांच्याशी केलेली बातचीत..

  • विभागाचे संशोधनात्मक कार्य कोणते? 

शंभर वर्षांत समाजशास्त्र विभागात विविध विषयांवरील ३५० हून अधिक पीएचडी प्रबंध आणि एम.फिलचे १५० हून अधिक प्रबंध झाले. या विभागाचे संस्थापक सर पॅट्रीक गिड्स यांनी शहराचे नियोजन या विषयावर केलेले संशोधन आजही प्रमाण मानले जाते. विभागाचे दुसरे विभागप्रमुख जी. एस. घुऱ्ये यांनी ‘जात आणि वंश’ यावर संशोधन करून भारतीय समाजातील वास्तवाचे विस्तृत विश्लेषण केले आहे. ‘समाजशास्त्र’ विषयाचा विकास आणि विस्तार करण्याचे काम त्यांनी केले. याच विभागात ‘इंडियन सोश्योलॉजिकल सोसायटी’ची स्थापना झाली. जगभरात मानाचे स्थान असलेल्या ‘सोश्योलॉजिकल बुलेटीन’ची सुरुवातही १९५२ मध्ये इथूनच झाली. समाजशास्त्राचा चिंतनशील अभ्यास घडवून आणणाऱ्या ‘समाजशास्त्र परिषद’ची आजवर ४६ अधिवेशने झाली आहेत.

  •   शंभर वर्षांतील काही महत्त्वाच्या घडामोडी, विभागाची वाटचाल पुस्तक रूपात आणण्याचा विचार आहे का? 

दरवर्षी विभागातर्फे ‘सर पॅट्रीक गिड्स’, ‘जी. एस घुऱ्ये ’, ‘ए. आर. देसाई’, ‘इरावती कर्वे’ या दिग्गजांच्या स्मरणार्थ चार व्याख्यानमालांचे आयोजन करण्यात येते. याचे ध्वनीरूपात दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे. ते सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी पुस्तकरूपात प्रकाशित करण्याचे विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या दोन वर्षांत ही पुस्तके प्रकाशित केली जातील. 

  • विभागाच्या स्वायत्ततेचा विचार झाला आहे का? 

विभागाला १०० वर्षे पूर्ण झाल्याने स्वायत्तता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, परंतु त्यासाठी केवळ प्रस्ताव देऊन चालणार नाही, तर त्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने धोरण आखण्याची गरज आहे.

  • येत्या वर्षभरात काही महत्त्वाचे उपक्रम? 

विभागाचा शतक महोत्सव दोन वर्षांपासूनच साजरा करीत आहोत. ‘समाजशास्त्राची शंभरी’ हे राष्ट्रीय चर्चासत्र आम्ही २०१८ ला आयोजित केले होते. संशोधक विद्यार्थ्यांनी वाङ्मयातून चौर्यकर्म करून शोधनिबंध करता कामा नये.  नवे विषय, नवे संशोधन यादृष्टीने कार्यशाळा घेण्यावर आमचा भर आहे.     

  • विभागाला देश पातळीवर नेण्यासाठी काही प्रयत्न?

 सध्या देशभरातील २५ टक्के विद्यार्थी विभागात आहेत. दरवर्षी देशभरातील विद्यार्थ्यांची संख्या साधारण इतकीच असते. विभागात महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढवण्याची गरज आहे. आता समाजमाध्यमांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. विभागाची माहिती, प्रवेश प्रक्रिया, अभ्यासक्रमाचे महत्त्व याचे तपशील समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केले जात आहे.  

  • ऑनलाइन अभ्यासक्रम तयार करून जगभरातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल का?

जगभरात होत असलेल्या शैक्षणिक घडामोडी पाहता ऑनलाइन शिक्षण ही गरज बनली आहे, पण त्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.  ऑनलाइन शिक्षण देताना अभ्यासक्रम, अध्यापन याचे नव्याने नियोजन करावे लागेल. नियमांमध्ये बदल करावे लागतील. पण ऑनलाइन शिक्षण प्रणाली आज ना उद्या आपल्याला स्वीकारावीच लागेल. हायब्रिड पद्धतीने हा अभ्यासक्रम राबवायची आमची तयारी आहे. दोन वर्षांच्या पूर्ण अभ्यासक्रमात किमान एक सत्र तरी विद्यार्थ्यांने प्रत्यक्ष येऊन अभ्यास करायला हवा.

  • समाजशास्त्र विषयाला तुलनेने विद्यार्थ्यांचा कमी प्रतिसाद मिळतो?

 राज्यातील इतर विद्यापीठांच्या तुलनेने मुंबई विद्यापीठात कायमच विद्यार्थी संख्या अधिक असते. केवळ विद्यार्थीच नाही, तर शिक्षकांची संख्याही अधिक आहे. परंतु त्यातही वाढ व्हावी यासाठी विभागातून समाजशास्त्र विषयात शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रांत नावलौकिक मिळवलेल्या (alumani) माजी विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. पर्यावरण, जेंडर यांसारख्या उपविषयांनाही विद्यार्थी नक्कीच लाभतील.    

  • समाजशास्त्र अभ्यासक्रम हे अधिक रोजगाराभिमुख करण्यासाठी कोणते उपाय करता येतील?

 विभागामध्ये वेगवेगळय़ा विषयांत स्पेशलायजेशन करता येत असल्याने त्या त्या क्षेत्राचे रोजगार त्यांना उपलब्ध होतात. उदाहरण द्यायचे झाले तर, ‘सोश्योलॉजी ऑफ लॉ’ विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांना कायदे क्षेत्रातील जागा खुल्या होतात.  ‘सोश्योलॉजी ऑफ कम्युनिकेशन’ करणाऱ्या विद्यार्थ्यांना माध्यमात संधी मिळते. केवळ हेच नाही तर अन्य क्षेत्रांतही संधी उपलब्ध आहेत. येत्या काळात रोजगाराभिमुख अभ्यासक्रम निर्माण करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील.

 मुलाखत : नीलेश अडसूळ

The post आठवडय़ाची मुलाखत : समाजशास्त्राची शतक महोत्सवी वाटचाल.. appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JCR1zR
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.