Type Here to Get Search Results !

दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण

मुंबई: करोना रुग्णसंख्येत वाढ झाल्याने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत  संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर या परीक्षांची सर्व तयारी पूर्ण  झाली असून दोन्ही परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार होतील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.  विद्यार्थी आणि पालकांनी संभ्रमात राहू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

 करोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी तर परीक्षा पूर्णपणे रद्द करू सरासरी गुणांनुसार निकाल जाहीर करण्याची वेळ राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळावर आली होती. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत सध्या राज्यातील करोना परिस्थिती नियंत्रणात असल्याने तसेच शाळाही सुरू झाल्याने  दहावी आणि बारावीच्या परीक्षा त्याही ऑफलाइन घ्याव्यात अशी मागणी सर्वच क्षेत्रांतून होत होती. त्यानुसार यंदा बारावीची परीक्षा ४ मार्चपासून तर दहावीची परीक्षा १५ मार्चपासून घेण्याची घोषणा शिक्षण विभागाने महिनाभरापूर्वीच केली आहे.

 शिक्षणराज्य मंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी  शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत आणि बारावीच्या परीक्षा तयारीचा आढावा घेताना या परीक्षा महिनाभर पुढे ढकलण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रकानुसारच घेण्याची मागणी मुख्याध्यापक संघाने केली होती. त्यावरून राज्य शिक्षण मंडळ तसेच विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.

 या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा या ठरलेल्या वेळापत्रकानुसारच होतील, असे स्पष्टीकरण वर्षा गायकवाड यांनी दिले आहे. शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक आणि शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करूनच वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या परीक्षांची सर्व तयारी झाली असून करोना परिस्थितीचा सातत्याने आढावा घेत आहोत. १५ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा आढावा घेतला जाईल. त्या वेळी करोना परिस्थिती पाहून गरज वाटल्यास पुढील निर्णय घेतला जाईल, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

 दहावी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर मंडळाला पुन्हा पुरवणी परीक्षा घ्यावी लागते. त्याच्या निकालानंतर विद्यार्थ्यांना अकरावीचे प्रवेश घ्यायचे असतात. म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळेवर होणे महत्त्वाचे असून विद्यार्थी आणि पालकांनी परीक्षांबाबत कोणत्याही संभ्रमात राहू नये, परीक्षा वेळेवरच आणि लेखी स्वरूपात होतील, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.

The post दहावी आणि बारावीची परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच; शिक्षणमंत्र्यांचे स्पष्टीकरण appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/mw8IOlJKu
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.