Type Here to Get Search Results !

मुंबई-पारबंदर प्रकल्प वेगात

६० टक्के काम पूर्ण, लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कामाला सुरुवात

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) मुंबई-पारबंदर प्रकल्पाच्या (शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतू) कामाला वेग दिला आहे. आतापर्यंत प्रकल्पाचे सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे, तर आता येत्या काही दिवसांत या प्रकल्पातील एका महत्त्वाच्या, कठीण आणि गुंतागुंतीच्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. परदेशात वापरल्या जाणाऱ्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक म्हणजे स्ट्रेंथ स्टील डेक बसवण्यात येणार आहेत. देशात पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून यामुळे कामाचा वेग वाढणार आहे. तसेच सागरी सेतू अधिकाधिक मजबूत होणार असल्याचा दावा एमएमआरडीएकडून करण्यात आला आहे.

मुंबई ते नवी मुंबई प्रवास सुकर आणि वेगवान व्हावा यासाठी एमएमआरडीएकडून २१.८० किमी लांबीच्या शिवडी-न्हावा शेवा सागरी मार्गाची उभारणी करण्यात येत आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या प्रकल्पामुळे येत्या काळात आजूबाजूच्या परिसराचे रुपडे पालटणार असल्याचाही दावा करण्यात येत आहे.

करोना आणि इतर अडचणींमुळे प्रकल्पास विलंब झाला आहे. पण आता मात्र एमएमआरडीएने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार कामाला गती दिली जात असून या नियोजनानुसार काम पूर्ण केले जात आहे की नाही याचा नियमित आढावा घेण्यात येणार आहे.

महानगर आयुक्त एस.व्ही.आर. श्रीनिवास यांनी नुकताच या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतला. आतापर्यंत प्रकल्पाचे सरासरी ६० टक्के काम पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. तीन टप्प्यांत (पॅकेज) हे काम सुरू असून या तिन्ही टप्प्यांतील पायाभरणीचे (पायिलग) काम ८५ टक्के, पाइल्स कॅप्सचे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पात एकूण १०८९ खांब (पिलर्स) उभारण्यात येणार असून यातील ७५० खांबांची उभारणी पूर्ण झाली आहे. आता उर्वरित काम २०२३ मध्ये पूर्ण करून सागरी सेतू वाहतूक सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.

भारतात पहिल्यांदाच ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकचा वापर

आता प्रकल्पाचे काम आणखी वेगाने करण्यात येणार आहे. लवकरच एमएमआरडीए महत्त्वाच्या अशा टप्प्यातील कामाला सुरुवात करणार आहे. सागरी सेतू आणखी मजबूत करण्यासाठी आता ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक बसविण्यात येणार असल्याची माहिती श्रीनिवास यांनी दिली. हे डेक अत्यंत मजबूत असतात आणि वाहनांचा भार वाहण्याची त्यांची क्षमता इतर डेकपेक्षा अधिक असते. हे सहा पट लांब असल्याने काम वेगात पूर्ण होण्यास मदत होते. या डेकद्वारे १८० मीटर लांब अंतराची रचना केली जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे यासाठी खर्चही कमी येतो. हे तंत्रज्ञान परदेशात काही ठरावीक देशांतच वापरले जाते. भारतात आता पहिल्यांदाच या तंत्रज्ञानाचा वापर मुंबई-पारबंदर प्रकल्पात केला जाणार आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले.

The post मुंबई-पारबंदर प्रकल्प वेगात appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/31f7etP
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.