Type Here to Get Search Results !

कामचुकार कंत्राटदारालाच आणखी काम

एका पुलाचे काम रखडलेले असताना दुसऱ्या पुलाच्या कामाचे कंत्राट

मुंबई : कुर्ला येथील मिठी नदीवरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम वेळेत पूर्ण न करणाऱ्या कंत्राटदारावर दंडात्मक कारवाई न करताच दुसऱ्या पुलाच्या कामाचे कंत्राट देण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. साकिविहार रस्ता व मरोळ मरोशी रोडवरील या पुलाचे काम पूर्ण झाले नाही तर करोना रुग्णांना सेव्हन हिल्स रुग्णालयात जाणे जिकिरीचे होईल, असे कारण देत प्रशासनाने हे कंत्राट दिले आहे. विशेष म्हणजे स्थायी समितीमध्ये सर्वपक्षीय सदस्यांनी या प्रस्तावाला चर्चेविनाच मंजुरीही दिली आहे.

 कुर्ला कलिना रस्त्यावर मिठी नदीवरील अस्तित्वात असलेल्या पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्यासाठी एप्रिल २०१८ मध्ये १४ कोटी २२ लाख रुपयांचे काम देऊन कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली होती. मे २०२१ मध्ये पूर्ण होणे आवश्यक होते. मात्र अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. असे असताना याच कंत्राटदाराला त्याच परिसरातील आणखी एका पुलाचे काम देण्यात आले आहे. विशेष म्हणजे निविदा प्रक्रिया न राबवता हे काम कंत्राटदाराला देण्यात येणार आहे. या बाबतचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मांडण्यात आला असता बुधवारच्या बैठकीत चर्चेविना तो मंजूर करण्यात आला.

कुर्ला येथीलच कृष्णलाल मारवाह मार्गावरील पिकनिक हॉटेलजवळ ७ मीटर रुंदीचा मारवाह नावाचा पूल आहे. या पुलाची दक्षिणेकडील भिंत जुनमध्ये पडलेल्या मुसळधार पावसात कोसळली. त्यामुळे पुलाच्या स्लॅबला तडे गेले. तेव्हापासून हा पूल वाहतुकीसाठी बंद केला आहे. हा पूल साकीविहार रस्ता व मरोळ मरोशी रोडवरील सेव्हन हिल्स रुग्णालयाकडे जाण्यासाठी सोयीस्कर ठरत होता. हा पूल बंद केल्यामुळे रुग्णालयाकडे जाण्यासाठी अंधेरी कुर्ला घाटकोपर मार्गावरून जावे लागते. त्यासाठी ४ ते ५ किमी वळसा घालून जावे लागते. त्यामुळे या पुलाचे काम त्वरित करून घेणे आवश्यक असल्याचे कारण प्रशासनाने दिले आहे. कुर्ला कलिना मार्गावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम करणाऱ्या कंत्राटदारालाच हे काम ११ कोटी ८४ लाख रुपयांचे देण्यात येणार आहे. त्यामुळे या एकाच कंत्राटदाराला २६ कोटी ७ सात रुपयांचे काम देण्यात आले आहे. तांत्रिक अडचणींमुळे या कंत्राटदाराला आधीचे काम पूर्ण करता आलेले नाही, अशीही पाठराखण प्रशासनाने केली आहे. इतकेच नाही तर अतिरिक्त कामामुळे वाढलेल्या खर्चापोटी निधी आणि १५ महिन्यांची मुदतवाढसुद्धा देण्यात आली आहे. 

The post कामचुकार कंत्राटदारालाच आणखी काम appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3JozlrH
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.