Type Here to Get Search Results !

सागरी किनारा मार्गावरील पहिला बोगदा प्रगतिपथावर

मुंबई : मुंबई किनारा मार्ग प्रकल्पातील पहिल्या बोगद्याचे काम येत्या आठ दहा दिवसांत पूर्ण होणार आहे. एका बोगद्याचे खोदकाम नऊ महिन्यांमध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र एक वर्ष लोटल्यानंतर पहिल्या बोगद्याचे दोन किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित ७० मीटर लांबीच्या बोगद्याचे खोदकाम येत्या आठ-दहा दिवसांत पूर्ण करण्यात येणार आहे. मुंबई किनारा मार्ग प्रकल्पांतर्गत दोन्ही बाजूने वाहतुकीसाठी दोन बोगद्यांचे काम अंतर्भूत आहे. प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटीदरम्यान २.०७० किलोमीटर लांबीचे बोगदे दोन्ही बाजूने बांधण्यात येत आहेत. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या छोटा चौपाटीपर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते मलबार हिलच्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांचे खोदकाम जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढय़ा खोलीवर करण्यात येत आहे. गेल्या वर्षी ११ जानेवारी २०२१ रोजी प्रियदर्शनी पार्क येथून बोगदा खणण्यास सुरुवात झाली होती. या बोगद्याचा एक किलोमीटरचा टप्पा ४ सप्टेंबरला, तर २ किलोमीटरचा टप्पा २९ डिसेंबर २०२१ रोजी पूर्ण झाला. पहिल्या बोगद्यासाठी उर्वरित ७० मीटर खोदकाम बाकी असून ते येत्या १० दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सागरी किनारा प्रकल्पाचे जवळपास ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर, २०२३ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित असल्याची माहिती प्रकल्पाचे मुख्य अभियंता विजय निगोट यांनी दिली.

बोगद्यांची वैशिष्टय़पूर्ण रचना

  या दोन्ही बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७० किलोमीटर एवढी आहे. दोन्ही बोगद्यांचा व्यास हा १२.१९ मीटर आहे. या बोगद्यांचे खोदकाम करताना आतील बाजूने वर्तुळाकृती पद्धतीने काँक्रिटचे अस्तरीकरण केले जाते. त्यामुळे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर बोगद्याचा अंतर्गत व्यास हा प्रत्येकी ११ मीटर इतका असणार आहे. येणाऱ्या व जाणाऱ्या वाहतुकीसाठी दोन बोगद्यांचा स्वतंत्रपणे वापर करण्यात येणार आहे. सुरक्षेची व प्रतिबंधात्मक उपायोजना म्हणून दोन्ही बोगद्यांना जोडणारे एकंदर ११ छेद बोगदेदेखील मुख्य बोगद्यांचा भाग असणार आहेत. सदर बोगद्यांसाठी आपत्कालीन नियत्रंण कक्ष असून त्यामध्ये स्वयंचलित यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार आहे. सदर बोगद्यांमध्ये ‘सकाडरे’ वायूविजन प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार असून भारतामधील रस्ते बोगद्यांसाठी तिचा प्रथमच वापर करण्यात येत आहे.

  या बोगद्यांचे खोदकाम टीबीएम (टनेल बोअरींग  मशिन) सयंत्राच्या सहाय्याने केले जात असून ते भारतातील सर्वात मोठय़ा व्यासाचे टीबीएम संयंत्र आहे. या संयंत्राचे ‘मावळा’ असे नामकरण करण्यात आले आहे. हे संयंत्र वैशिष्टय़पूर्ण आहे. १२.१९ मीटर व्यास असणाऱ्या मावळा संयंत्राची उंची ४ मजली इमारती एवढी आहे. तर त्याची लांबी तब्बल ८० मीटर एवढी आहे. त्याचे वजन सुमारे २८०० टन इतके असून त्याबरोबर वापरण्यात येणाऱ्या स्लरी ट्रीटमेंट प्लांटच्या यंत्रसामुग्रीचे वजन सुमारे ६०० टन आहे. ‘मावळा’ संयंत्राची पाती दर मिनिटाला साधारणपणे २.६ वेळा गोलाकार फिरू शकणारी आहेत.

The post सागरी किनारा मार्गावरील पहिला बोगदा प्रगतिपथावर appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3mJaLrL
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.