Type Here to Get Search Results !

रस्ते उभारणीचा धडाका

सागरी किनारा मार्ग, रस्ते सुधारणा प्रकल्पासाठी सल्लागारांची नेमणूक 

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी नोव्हेंबरमध्ये विविध रस्ते प्रकल्पास मान्यता दिली आहे. ठाण्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरणाऱ्या बाळकुम ते गायमुख सागरी किनारा मार्ग आणि आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यासाठी एमएमआरडीएने मंगळवारी निविदा जारी केली. तर ठाण्यातील दोन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिता निविदा मागविण्यात आली आहे.

 एमएमआरडीएने नियोजन प्राधिकरण म्हणून आता मुंबईबरोबर आपला मोर्चा मुंबई महानगर प्रदेशाकडे वळवला आहे. तेथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासाठी मेट्रोचे जाळे विणले जात आहे. तर दुसरीकडे वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी नवीन रस्ते प्रकल्पही हाती घेण्यात आले असून रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबरमध्ये पार पडलेल्या प्राधिकरणाच्या बैठकीत ठाण्यातील विविध प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यातील महत्त्वाकांक्षी अशा ठाणे सागरी किनारा मार्ग आणि आनंदनगर ते साकेत उन्नत रस्ता प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या दोन्ही प्रकल्पांसाठी मंगळवारी सल्लागाराची नियुक्ती करण्याकरिता निविदा मागविण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.

 ठाण्यात वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी २००७ मध्ये १२० कोटी रुपयांच्या ठाणे सागरी किनारा मार्ग प्रकल्पाची घोषणा करून प्रकल्पास मंजुरी देण्यात आली होती. पण अनेक कारणांनी हा प्रकल्प रखडला. परिणामी, प्रकल्पाचा खर्च वाढून तो १३०० कोटी रुपयांवर पोहोचला. हा प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय २०१८ मध्ये घेण्यात आला होता. पुढे त्यात बदल करून नोव्हेंबरमध्ये प्राधिकरणाने या १३.४३ किमी लांबीच्या प्रकल्पासाठी १३१६.१८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. आता या प्रकल्पासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. तर आनंदनगर ते साकेत या ६.३० किमी लांबीच्या आणि सहा मार्गिकेच्या प्रकल्पासाठी सल्लागार नियुक्त करण्याकरिताही मंगळवारी निविदा जारी करण्यात आल्या. त्याच वेळी ठाण्यातील दालमिल नाका ते २२ क्रमांक सर्कल आणि दत्त मंदिर ते टीजेएसबी बँक या दोन रस्त्याच्या दुरुस्तीसाठीही सल्लागार नियुक्त करण्याकरिता निविदा जारी करण्यात आली आहे. या तिन्ही प्रकल्पांसाठी स्वतंत्र सल्लागार असणार आहेत. त्याच्यांवर निविदापूर्व प्रक्रिया राबविण्यासह प्रकल्पाचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असणार आहे, असे श्रीनिवास यांनी सांगितले.

The post रस्ते उभारणीचा धडाका appeared first on Loksatta.



from मुंबई – Loksatta https://ift.tt/3qzowKu
via IFTTT

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.