उद्धव ठाकरे यांचा विरोधकांना टोला; करोना चाचणी बंधनकारक करण्याची योजना
मुंबई : दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करताच राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नाही, पण पाकिस्तानात कधी बॉम्ब फोडताय याची देश वाट पाहतोय, असा वर्मी घावच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपला लगावला. यापुढील काळात करोनाची चाचणी बंधनकारक करण्याचे सूतोवाचही त्यांनी के ले.
अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केलेल्या आरोपावर दिवाळीनंतर बाँब फोडण्याचा इशारा फडणवीस यांनी दिला आहे. त्याबाबत बोलताना ठाकरे यांनी नाव न घेता फडणवीसांच्या इशाऱ्याची खिल्ली उडविली. करोनाच्या विषाणूप्रमाणे आपल्याकडे आरोपांमध्येही उत्परिवर्तन होत असल्याचा चिमटाही त्यांनी काढला.
करोनाची लाट ओसरल्यानंतर लोक निर्धास्त झाले असून लसीकरणाचा वेगही मंदावला आहे. मात्र पाश्चिमात्य देशातील करोनाची परिस्थिती पाहता लोकांनी करोना नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक असून लसही घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला के ले. करोनाची तिसरी लाट येणार की नाही याबाबत काहीच स्पष्टता नसल्याचेही त्यांनी सांगितले.
सध्या करोनाबाबतची भीती कमी झाली असून लसीकरणही थंडावले आहे. पाश्चिमात्य देशात करोनाचा उद्रेक पाहायला मिळत असून आपल्याकडे सुरुवातीस दिसून आलेला डेल्टा प्लसचा विषाणू तेथे मोठ्या प्रमाणात आढळत आहे. लसीकरण झालेल्यांना मात्र त्याचा कमी त्रास होत असल्याचे समोर आले आहे. देशात सध्या कर्नाटकात बाधितांची संख्या वाढत असून पाश्चिमात्य देशात करोना विषाणूचे उत्परिवर्तन होऊन नवा विषाणू आला तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. त्यामुळे करोनाच्या पुढच्या लाटेचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याबरोबरच ‘एचआयव्ही- एड्स’प्रमाणे करोनाची आरटीपीसीआर चाचणीही बंधनकार करण्याचे संके त ठाकरे यांनी या वेळी दिले.
राज्यातील निर्बंध शिथिल करीत असताना ज्या दिवशी के वळ करोना रुग्णांना ७०० मेट्रिक टनपेक्षा अधिक प्राणवायू लागेल त्या दिवशी राज्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाईल याची आठवणही ठाकरे यांनी करून दिली.
मंत्रालयात हजेरी
मुख्यमंत्री मंत्रालयात येत नसल्याच्या विरोधकांच्या टीके ला उत्तर देताना मंत्रालयात नक्कीच जायला पाहिजे, पण मंत्रालयात गेलो नाही म्हणजे कोणाचे काम झाले नाही असे नाही. राज्यभरात नुसते कामाशिवाय फिरणे, पाट्या टाकण्याचे काम करून काही होत नाही. इतके दिवस जे मंत्रालयात जात होते, त्यांनी जे केले तेच निस्तरायला आता मंत्रालयात जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
‘मुस्लीम आरक्षणाबाबत मोदी निर्णय घेतील’
मराठा आरक्षणाचा कायदा करूनही तो सर्वोच्च न्यायालयात टिकू शकला नाही, या पार्श्वभूमीवर मुस्लीम आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदीच निर्णय घेतील, अशी सावध भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी घेतली. केंद्राकडे बोट दाखवून मुस्लीम आरक्षणाची मागणी करणाऱ्या काँग्रेसलाही त्यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिल्याचे मानले जात आहे.
The post राजकीय फटाक्यांसाठी दिवाळीची गरज नाही appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/31nmNPN
via IFTTT