मुंबई : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एनसीबी) काम करीत असून फडणवीस यांचे निकटवर्तीय कार्यालयात वावरत आहेत, असा आरोप करीत अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस यांचे माफियाबरोबरचे छायाचित्र समाजमाध्यमांवर प्रसिद्धीस दिले. त्यावर एका गाण्याच्या ध्वनिमुद्रणाच्या वेळी संबंधित संस्थेच्या व्यक्तींबरोबर आलेल्या काही जणांनी आम्हा दोघांबरोबर छायाचित्रे काढून घेतली होती. उलट मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी संबंध असून त्याबाबतचे पुरावे दिवाळीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना आणि प्रसिद्धीमाध्यमांना देणार असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिले.
मध्यस्थाचे काम करणाऱ्या नीरज गुंडे यांचे फडणवीस यांच्याशी संबंध असून ते एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या संपर्कात असतात. फडणवीस यांच्या इशाऱ्यावरून एनसीबीची कारवाई सुरू असून मोठे मासे बाहेरच असल्याचा आरोप मलिक यांनी केला. मागासवर्गीय आयोगाचे उपाध्यक्ष अरुण हलधर हे वैधानिक पदावर असताना समीर वानखेडे यांची भेट घेऊन प्रसिद्धीमाध्यमांमधून वक्तव्ये करीत आहेत, त्यामुळे त्यांच्याविरोधात राष्ट्रपतींकडे तक्रार करणार असल्याचे मलिक यांनी सांगितले.
फडणवीसांचे प्रत्युत्तर
मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना फडणवीस म्हणाले, माझ्याविरोधात काही आरोप करता येत नसल्याने पत्नीसंबंधातील छायाचित्र समाजमाध्यमांवर टाकण्यात आले आहे. संबंधित कार्यक्रम कंपनीने त्याबाबत खुलासा केला असून अटक झालेल्या व्यक्तीशी आमचा कोणताही संबंध नाही. मी काचेच्या घरात राहत नाही. ज्यांचे संबंध गुन्हेगारी जगताशी आहेत, अशांनी अमली पदार्थांबाबत बोलू नये, असेही फडणवीस यांनी बजाविले.
मलिक यांनी लवंगी फटाका लावला आहे, मी दिवाळीनंतर मलिक यांचे गुन्हेगारी जगताशी असलेल्या संबंधातील पुरावे जाहीर करून बॉम्ब फोडणार आहे, असा इशारा फडणवीस यांनी दिला. तर चोराच्या उलट्या बोंबा, विनाशकाले विपरीत बुद्धी, असे प्रत्युत्तर अमृता फडणवीस यांनी मलिक यांना दिले आहे.
The post फडणवीस-मलिक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी appeared first on Loksatta.
from मुंबई – Loksatta https://ift.tt/3Buwloo
via IFTTT